फवारणीअभावी गोंदिया शहर डासांच्या ताब्यात
By admin | Published: August 23, 2014 01:53 AM2014-08-23T01:53:04+5:302014-08-23T01:53:04+5:30
शहरात सध्या मोठ्या प्रमाणात डासांचा प्रकोप वाढल्याचे दिसून येत आहे. नगर पालिका प्रशासनाच्या सुस्त कार्यप्रणालीमुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहेत.
गोंदिया : शहरात सध्या मोठ्या प्रमाणात डासांचा प्रकोप वाढल्याचे दिसून येत आहे. नगर पालिका प्रशासनाच्या सुस्त कार्यप्रणालीमुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. पालिकेकडून वेळोवेळी फवारणी व कीटकनाशकांचा मारा केला जात नसल्यामुळे डासांचा प्रकोप वाढला आहे.
विशेष म्हणजे पालिकेकडे गप्पी मासे असतानाही अद्याप शहरातील पाण्याच्या डबक्यांत त्यांना सोडण्यात आलेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, पालिकेकडे संपूर्ण शहरासाठी फक्त एकच फॉगींग मशीन उपलब्ध आहे. यामुळेही डासांची उत्पत्ती वाढत असून जिल्ह्यात ग्रामीण भागात डेंग्यू व मलेरियाने थैमान घातले आहे. आता शहर सुद्धा डेंग्यू व मलेरियाच्या विळख्यात आले असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळा हा आजारांचा काळ म्हणूनच ओळखला जातो. डासजन्य आजारांचा हा प्रमुख काळ असतो व त्यानुसार यंदाही डेंग्यू व मलेरियाने जिल्ह्यात चांगलाच कहर केल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील काही गावे डेंग्यूच्या विळख्यात अडकली असून यामुळे काहींचा जीव सुद्धा गेला आहे. डासांपासून उद्भवणाऱ्या या आजारांवर नियंत्रण घालण्यासाठी ग्रामीण भागात जिल्हा हिवताप विभाग तर शहरात नगर परिषद जबाबदार असते. मात्र या दोन्ही यंत्रणा फक्त कागदोपत्री कारभार करीत असल्याचे बघावयास मिळत आहे.
यामध्ये शहराकडे लक्ष दिल्यास, शहरातील रस्त्यांची दुर्गती व त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून आहे. यात डासांची उत्पत्ती होत आहे. यावरही पालिकेकडून पाहिजे तशी फवारणी व कीटकनाशक पावडरचा मारा केला जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी शहरात डासांचा प्रकोप वाढला असून शहरवासी त्रस्त झाले आहेत. डासांच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिकेकडे आजघडीला कॅम्पाडॉल नामक कीटकनाशक पावडर उपलब्ध आहे. तर हिवताप कार्यालयाकडून अळी नाशक टेमीफॉल नामक द्रव्य पुरविण्यात आले आहे. असे असतानाही शहरात मात्र त्यांची फवारणी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
फवारणीसाठी पालिकेने एका संस्थेकडून आठ माणसे कंत्राटी तत्वावर घेतली असून चार जणांचे गट पाडून त्यांच्याकडून फवारणी केली जाणार आहे. तर शहरात फवारणीचे काम सुरू असल्याचे आरोग्य निरीक्षक मनकवडे यांनी सांगीतले. शिवाय हिवताप कार्यालयाकडून पालिकेला डासांच्या अळ््या खाणारी गप्पी मासे देण्यात आली आहेत. शहरातील राजस्थान शाळेसमोरील पालन केंद्रात मासे तयार आहेत. मात्र पालिकेने अद्याप पाण्याच्या डबक्यांत त्यांना सोडलेले नाही.
परिणामी डासांची उत्पत्ती वाढतच चालली आहे. यामुळेच शहर डेंग्यू व मलेरियाच्या विळख्यात अडकले असून डेंग्यूचे काही रूग्ण सुद्ध आढळून आले आहेत. (शहर प्रतिनिधी)