गोंदिया विधानसभेवर पुन्हा सेनेचा दावा?

By admin | Published: July 1, 2014 11:31 PM2014-07-01T23:31:52+5:302014-07-01T23:31:52+5:30

सलग दोन वेळा गोंदिया विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारी शिवसेना यावेळी हा मतदार संघ भाजपसाठी सोडणार असल्याची शक्यता गेल्या वर्षभरापासून व्यक्त केली जात होती.

Gondia claims re-assembly? | गोंदिया विधानसभेवर पुन्हा सेनेचा दावा?

गोंदिया विधानसभेवर पुन्हा सेनेचा दावा?

Next

भाजपात अस्वस्थता : मेळाव्यातून शिवसैनिकांना जागृत करण्याचा प्रयत्न
गोंदिया: सलग दोन वेळा गोंदिया विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारी शिवसेना यावेळी हा मतदार संघ भाजपसाठी सोडणार असल्याची शक्यता गेल्या वर्षभरापासून व्यक्त केली जात होती. मात्र शिवसेना आपला हा दावा सहजासहजी सोडण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे भाजपाच्या गोटात मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. गोंदियात शनिवारी झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात थेट कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंना आणून शिवसेनेने पुन्हा एकदा शिवसैनिकांना जागृत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
भाजप-सेना युतीत आतापर्यंत गोंदिया विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात होता. १९९५ मध्ये प्रस्थापितांविरोधात आलेल्या लाटेत शिवसेनेचे रमेश कुथे विजयी झाले. त्यानंतर १९९९ मध्येही त्यांनी सलग दुसऱ्यांचा विजय मिळवून हा मतदार संघ शिवसेनेसाठी हक्काचा करून घेतला. मात्र नंतरच्या दोन्ही निवडणुकीत त्यांना विजय मिळविणे कठीण झाले. अडीच वर्षापूर्वी झालेल्या गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. याचवेळी भाजपने ४० पैकी १६ जागा पटकावून नगर परिषदेत सर्वात जास्त जागा पटकावणारा पक्ष म्हणून नोंद केली.
एकीकडे भाजपचे वाढलेले वर्चस्व तर दुसरीकडे शिवसेनेची ढिली झालेली पकड पाहता पुढील निवडणुकीत गोंदिया विधानसभेच्या जागेवर युतीमधील घटकपक्ष असलेला भाजप दावा करणार हे जवळजवळ निश्चित समजले जात आहे. भाजपला तिकीट दिल्यास कोण रिंगणात उतरेल आणि कसा सामना रंगू शकेल याच्या चर्चाही अधूनमधून चवीने केल्या जात आहेत. त्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, विद्यमान जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, माजी अध्यक्ष नेतराम कटरे, जिल्हा महामंत्री दीपक कदम हे इच्छुकांच्या लाईनमध्ये आहेत.
विशेष म्हणजे भाजपला सर्वाधिक जागा मिळवून देणाऱ्या गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीची धुरा अग्रवाल यांच्याकडेच होती. त्यामुळे तिकीट वाटपात युतीकडून हा मतदार संघ भाजपला देण्यात यावा असा दावा भाजपच्या गोटातून केला जात आहे. असे असताना शिवसेनेने पुन्हा आपल्या धनुष्याची दोरी बांधणे सुरू केले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. शिवसेनेकडे हा मतदार संघ कायम राहिल्यास पुन्हा एकदा रमेश कुथे रिंगणात उतरणार की आपले धाकटे बंधू आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजकुमार कुथे यांना पुढे करणार याबाबतही चर्चा रंगत आहे.
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचाही उत्साह वाढला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षीय संघटन मजबूत करण्याकडे फारसे लक्ष न देणाऱ्या शिवसेनेने कार्यकर्ता मेळावा घेऊन निवडणुकीची चाहूल दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Gondia claims re-assembly?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.