गोंदिया आगाराला बसतोय दररोज ८ लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:29 AM2021-05-21T04:29:37+5:302021-05-21T04:29:37+5:30
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन करावे लागले असून राज्याची सर्वच अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. दुसऱ्या ...
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन करावे लागले असून राज्याची सर्वच अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात प्राणहानी केल्याने जनता आता चांगलीच धास्तावलेली आहे. शासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच नातेवाईक आजारी असल्यास त्यांची भेट व मृत्यू झाल्यास प्रवासाला मुभा दिली आहे. मात्र नागरिकांनी आता प्रवासाकडे पाठ फिरविल्यामुळे प्रवाशांअभावी लालपरीची चाकेच थांबली असून ती जागीच उभी आहे.
मागील वर्षी कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्य रस्ते परिवहन महामंडळाला चांगलाच फटका बसला होता. त्यात आता दुसऱ्या लाटेच्या लॉकडाऊनने पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा मात्र राज्य शासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच आजारी नातेवाईकाची भेट किंवा मृत्यू झाल्यास प्रवासाला मुभा दिली आहे. मात्र दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली आहे. याची दहशत आजही नागरिकांच्या मनात असल्याने महत्त्वाच्या कामानेच घराबाहेर पडत असून प्रवास पूर्णपणे बंद ठेवला आहे.
परिणामी राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या लालपरीची चाके जागीच थांबली असून येथील आगाराला त्याचा चांगलाच फटका बसत आहे. आगारात दररोज बसेस लावल्या जात आहेत. मात्र प्रवासीच नसल्याने बसेस आहेत तशाच उभ्या राहत आहेत. किमान १०-१५ प्रवासी उपलब्ध झाल्यास वेगवेगळ्या मार्गांवर बसेस सोडण्याची आगाराची तयारी आहे. मात्र शोकांतिका अशी की, तेवढे प्रवासीही मिळत नसल्याने आगाराची अडचण होत आहे.
-----------------------------
दररोज ८-१० लाखांचा फटका
या महिन्यातील ५-६ तारखेपासून प्रवाशांनी येथील बसस्थानकाकडे फिरकणेच बंद केल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या धास्तीने नागरिक प्रवास टाळत असल्याने याचे हे परिणाम जाणवत आहेत. बसस्थानकावर बसेस उभ्या केल्या जात असूनही प्रवासी येत नसल्याने आगाराला दररोज सुमारे ८-१० लाख रूपयांचा फटका सहन करावा लागत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे आगाराची हीच स्थिती झाली होती. आता मध्यंतरी स्थिती रूळावर येत असताना आता पुन्हा तेच दिवस परतून आले आहेत.
---------------------------------
कोट
१०-१५ प्रवासी मिळाल्यास आम्ही वेगवेगळ्या मार्गांवर बसेस सोडण्यास तयार आहोत. मात्र बसेस उभ्या करूनही प्रवासी येत नसल्याने त्या दिवसभर तशाच उभ्या राहत आहेत. परिणामी आगाराला फटका बसत आहे.
- संजना पटले, गोंदिया आगार प्रमुख