गोंदिया जिल्ह्यात पोलिसांमुळे फुलली २५ मुलींची मुस्कान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 11:41 AM2021-01-05T11:41:43+5:302021-01-05T11:45:12+5:30
Gondia News प्रियकराच्या नादी लागून घर सोडून पसार झालेल्या २५ मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्याचे कार्य जिल्हा पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान-९ च्या माध्यमातून केले आहे.
नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रियकराच्या नादी लागून घर सोडून पसार झालेल्या २५ मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्याचे कार्य जिल्हा पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान-९ च्या माध्यमातून केले आहे. यामध्ये १८ वर्षांखालील १४, तर १८ वर्षांवरील ११ मुलींचा समावेश आहे.
प्रियकराच्या नादात सैराट झालेल्या मुली व तरुणींना जिल्हा पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान-९ राबवून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. प्रियकराच्या नादात आई-वडिलांना सोडून पळून गेलेल्या मुली हेलपाट्या खाल्ल्यानंतर पोलिसांच्या मदतीने घरी पोहोचल्या आहेत. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या यशस्वी संचालनामुळे त्या मुली घरी परतल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यातील मुलींना शोधून त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात गोंदिया जिल्हा पोलिसांना यश आले आहे.
मध्यंतरी आलेल्या ‘सैराट’ या प्रेमकेथेवर आधारित चित्रपटाने चांगलीच धूम घातली होती. काही चित्रपट हे फक्त टाईमपाससाठी असतात, तर काही चित्रपटांतून जीवनात काही शिकवण घेता येते असे असतात. मात्र, ‘सैराट’ या चित्रपटातून तरुण-तरुणींनी काय बोध घेतले हे त्यांचे त्यांनाच माहिती. मात्र, कोवळ्या वयात निर्माण होणाऱ्या आकर्षणाला प्रेम समजून मुला-मुलींचे घर सोडून पळून जाण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. मुला-मुलींना आदर्श नागरिक घडविण्याचे स्वप्न रंगवत असताना मुलींनी आई-वडिलांच्या अपेक्षांवर पाणी फेरून आपल्या प्रियकरासोबत पलायन केल्याच्या घटना त्याची साक्ष देत आहेत.
सर्वच साधने सहजरीत्या उपलब्ध झाल्याने आता कोवळ्या वयातच मुला-मुलींंना साधे आकर्षण म्हणजे प्रेम वाटू लागले आहे. आई-वडील आपल्या पाल्यांच्या सुविधेसाठी त्यांना पाहिजे ते साधन उपलब्ध करून देतात. यातूनच शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींच्या हाती मोबाईल आला आहे. त्यामुळे ते मोबाईलच्या माध्यमातून सतत एकमेकाच्या संपर्कात राहत असून, त्यांचे प्रेम फुलते. मोबाईलचा चांगल्या गोष्टींसाठी वापर करण्याच्या हेतूने आईवडील त्यांना मोबाईल देतात; परंतु त्याच्या विपरीत जाऊन आपले प्रेम फुलविण्यासाठी या मोबाईलचा अधिक वापर होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात प्रेमाचे आमिष देत तरुणींचे लैंगीक शोषण करण्याचेही प्रमाण मोठे आहे. वर्षाकाठी १०० च्या घरात लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण जिल्हा पोलिसांकडे दाखल केले जात आहेत. विशेष म्हणजे, शेकडो प्रकरणे पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचतच नाही हे सुद्धा नाकारता येत नाही. अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून प्रेमाच्या नाट्यातून त्यांचे लैंगिक शोषण करणारे कमी नाहीत. वर्ष - दोन वर्षे प्रेमाच्या आणाभाका केल्यावर त्या मुलींना वाऱ्यावर सोडण्याचेही प्रकार जिल्ह्यात झाले आहेत. यातूनच जिल्ह्यातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलींची माहिती घेतली असता सर्वांत जास्त मुली गोंदिया शहरातून पळून गेल्या असल्याचे समजते. गोंदिया शहरातून ज्या मुली पळून गेल्या, त्यातील बहुतांश मुली शिकवणी वर्गाच्या नावावर घरातून बाहेर पडल्या होत्या. शिकवणी वर्गासाठी जाणाऱ्या मुली प्रियकरासोबत दररोज सायंकाळी किंवा सकाळीच भेटून आपल्या प्रेमकहाणीचा पुढचा पाढा शिकवणी वर्गाच्या नावावरच गात असतात. आई-वडिलांनी या प्रकाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
मुलींना केले पालकांच्या स्वाधीन
१ ते ३१ डिसेंबर या महिनाभराच्या कालावधीत राबविलेल्या ऑपरेशन मुस्कान- ९ मोहिमेत गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत १, गोरेगाव ४, आमगाव १, सालेकसा २, डुग्गीपार २, चिचगड २, तिरोडा ३, तर १८ वर्षांवरील ११ मुली मिळून आल्यात. त्यात अर्जुनी- मोरगाव, नवेगावबांध व गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत प्रत्येकी २ मुली अशा ६, तर रामनगर, गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण, चिचगड व रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत प्रत्येकी १ अशा एकूण ११ मुली पोलिसांच्या हाती लागल्या असून, त्यांना पालकांच्या स्वाधीन केले आहे.