गोंदिया जिल्ह्यात विद्यार्थिनींना अश्लील चित्रफीत दाखविणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 09:40 AM2017-12-23T09:40:50+5:302017-12-23T09:42:53+5:30
इयत्ता सहाव्या व सातव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना एका मुख्याध्यापकाने अश्लिल चित्रफीत दाखविल्याची घटना गुरूवारी (दि.२१) रात्री उशीरा तालुक्यातील घुमर्रा येथे उघडकीस आली.
आॅनलाईन लोकमत
गोरेगाव : इयत्ता सहाव्या व सातव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना एका मुख्याध्यापकाने अश्लिल चित्रफीत दाखविल्याची घटना गुरूवारी (दि.२१) रात्री उशीरा तालुक्यातील घुमर्रा येथे उघडकीस आली. हा प्रकार विद्यार्थिनीच्या पालकांना कळताच त्यांनी पोलीस स्टेशन गाठून मुख्याध्यापका विरोधात पोलिसात तक्रार केली. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
जयेन्द्र रामाजी शहारे (५३) असे त्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते तालुक्यातील घुमर्रा येथील जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे. प्राप्त माहितीनुसार सदर मुख्याध्यापकाने १९ डिसेंबरपासून शाळेतील विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित मोबाईल व कॅम्प्युटरवर दाखविणे सुरु केल्याने विद्यार्थिनीमध्ये याची चर्चा होती. यातील काही विद्यार्थिनींनी हा प्रकार घरी सांगितल्याने पालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. त्यानंतर काही पालकांनी गुरूवारी (दि.२१) रोजी सकाळी शाळेत जाऊन मुख्याध्यापकाला याचा जाब विचारला. दरम्यान या घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी शाळेकडे धाव घेत शाळ बंद करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शाळेच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक एस. आर.नारनवरे ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचताच गावकरी आक्रमक झाल्याने डुग्गीपार व आमगाव पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. नारनवरे यांनी मोठ्या शिताफीने मुख्याध्यापकाला लोकांच्या तावडीतून शाळेबाहेर काढून अटक केली. गुरूवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी योगराज बळीराम चौधरी (६३) रा. घुमर्रा यांनी आरोपी जयेन्द्र रामाजी शहारे (५३) या मुख्याध्यापका विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन अश्लिल चित्रफित दाखवून विनयभंग करणे भादंवि ३५४ (अ) ३, व लैगिंक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ कलम ११ (३) १२ सहकलम अन्वये गुन्हा नोंद करुन मुख्याध्यापकाला अटक केली. या प्रकारणाचा तपास एस. आर. नारनवरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
गावकऱ्यांचे शाळा बंदचे आवाहन
या प्रकरणाला घेऊन गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे. गावकऱ्यांनी शुक्रवारी (दि.२२) रोजी शाळा बंद करण्याचे व विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचे आवाहन केले.गावातील शाळा सुधार समिती, सरपंच, सदस्य व पोलीस पाटील यांनी संबंधित मुख्याध्यापकास त्वरित निलंबित करण्याची मागणी केली आहे.
मुख्याध्यापकावर निलबंनाची कारवाई
घुमर्रा येथील गावकऱ्यांचा रोष आणि घटनेचे गांर्भिय ओळखत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने मुख्याध्यापकावर शुक्रवारी (दि.२२) रोजी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे मागील पंधरा दिवसातील जिल्ह्यातील ही दुसरी घटना होय. या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.