गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त; ३५ दिवसात नवीन रुग्णाची नोंद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 02:42 PM2020-05-16T14:42:05+5:302020-05-16T14:42:24+5:30
गोंदिया जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळेच मागील ३५ दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर कोरोना बाधीत रुग्ण देखील कोरोनामुक्त झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळेच मागील ३५ दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर कोरोना बाधीत रुग्ण देखील कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल केल्याने सर्वच व्यवहार पूर्वपदावर आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी बाहेरील जिल्ह्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. तर कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडीही लक्षणे दिसताच अशा व्यक्तींना शासकीय आयसोलेशन कक्ष व क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे.तसेच जिल्ह्याच्या सर्व सीमा सुध्दा सील करण्यात आल्या आहे. त्यामुळेच मागील ३५ दिवसांपासून जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यात मदत होत आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ३५७ व्यक्तींचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ३४७ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. १० नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.