तलावांचा गोंदिया जिल्हा पडतोय कोरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 01:18 PM2019-01-07T13:18:11+5:302019-01-07T13:20:06+5:30
यंदा सुरूवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसाने परतीच्या कालावधीत पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे तलावांचा जिल्हा कोरडा पडत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा सुरूवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसाने परतीच्या कालावधीत पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांनी तळ गाठल्याने तलावांचा जिल्हा कोरडा पडत असल्याचे चित्र आहे.
मागील तीन चार वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस होत असल्याने त्याचा परिणाम शेती आणि सिंचन प्रकल्पावर होत आहे. अत्यल्प पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर होत आहे. जिल्ह्यात सिंचन योग्य एकूण ६९ प्रकल्प आहे. तर चार प्रकल्प मोठे आहे. यापैकी तीन प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी दिले जाते. मात्र यंदा या चारही मोठ्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने रब्बी हंगामासाठी केवळ इटियाडोह जलाशयाचे पाणी २१०० हेक्टरला देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामुळेच यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी धानाची लावगड करु नये असे आवाहन कृषी विभागाने केले होते. मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प व मालगुजारी तलाव ज्यांचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतो अशा तलावांची संख्या ६५ आहे. मात्र सध्या स्थितीत यापैकी १४ तलावात केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर चिरचाळबांध व तेढा येथील तलावांनी आताच तळ गाठला आहे. मध्यम प्रकल्पाच्या चोरखमारा जलाशयात केवळ ७.३४ टक्के पाणीसाठा आहे. तर लघु प्रकल्पाच्या भदभदया तलावात ४.४३ टक्के, गुमडोह ३.९६ टक्के, रेहाडी ७.४५, रिसामा ३.१२, सोनेगाव ६.८५, सडेपार ०.३२, सेरपार जलाशयात केवळ ३.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर १० ते २० टक्के पाणीसाठा असलेले १५ जलाशयांचा समावेश आहे. बोदलकसा १७.०३ टक्के, चुलबंद १९.०३, रेेंगेपार १३.६६, आक्टीटोला १६.५३, पांगडी १७.४, राजोली ११.७२, जुनेवानी १९.६५ टक्के, बोपाबोडी १५.०६, काटी १७.३७, कोकणा १५.३८, खाडीपार १४.७८, निमगाव १२.७५, खोेडशिवणी १९.९६, नांदलपार ११.०७, ताडगाव ११.५० टक्के पाणीसाठा आहे.
शहराची भिस्त पुजारीटोलावर
महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेतंर्गत शहरवासीयांना पिण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागील वर्षी वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे गोंदियापासून ८० किमी अंतरावर असलेल्या पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणून शहरवासीयांची तहान भागविण्यात आली होती. तिच परिस्थिती यंदा असणार असून प्रशासनाने त्यादृष्टीने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत स्थिती बिकट
जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुनलेत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झाला आहे. जिल्ह्यातील ६५ तलावात सध्यास्थितीत केवळ २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ९ मध्यम प्रकल्पात २८.९३ टक्के, लघु प्रकल्पात २८.६९ टक्के पाणीेसाठा आहे. मामा तलावात ३१ टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे यंदा जानेवारी महिन्यातच अनेक सिंचन प्रकल्पांनी तळ गाठल्याने यंदाचा उन्हाळा चांगलाच कडक असणार असल्याचे बोलल्या जात आहे.