चार वर्षांत गोंदिया जिल्ह्याला मिळाले पाच पालकमंत्री; आता धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे पालकत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 12:21 PM2023-10-05T12:21:47+5:302023-10-05T12:23:09+5:30

जिल्ह्याबाहेरची परंपरा कायम

Gondia district got five guardian ministers in four years; Now the guardianship goes to Dharmarao Baba Atram | चार वर्षांत गोंदिया जिल्ह्याला मिळाले पाच पालकमंत्री; आता धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे पालकत्व

चार वर्षांत गोंदिया जिल्ह्याला मिळाले पाच पालकमंत्री; आता धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे पालकत्व

googlenewsNext

गोंदिया : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी (दि.४) ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा केली. गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची निवड केली आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्याला मागील चार वर्षांच्या काळात पाच पालकमंत्री मिळाले आहे. पुन्हा जिल्ह्याबाहेरील पालकमंत्री दिल्याने जिल्ह्यावासीयांमध्ये नाराजीचा सुर आहे.

स्थानिक पालकमंत्र्यांच्याबाबतीत गोंदिया जिल्हा नेहमीच दुर्दैवी ठरला आहे. जिल्हा निर्मितीनंतर महादेवराव शिवणकर, राजकुमार बडोले वगळता आतापर्यंत इतर जिल्ह्यातील नेतेच पालकमंत्री म्हणून लाभले आहे. तर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आतापर्यंत चार वर्षांच्या काळात गोंदिया जिल्ह्याला पाचवे पालकमंत्री मिळाले. महादेवराव शिवणकर राज्याचे मंत्री असताना १९९९ मध्ये भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली.

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवणकर यांनी प्रभावशाली भूमिका बजावली होती. त्यानंतरच्या काळात मात्र जिल्ह्यावर कायमच बाहेरचे पालकमंत्री लादण्यात आले. या पूर्वीचे पालकमंत्री तर वर्षातून फक्त झेंडावंदन करण्याकरिताच येत होते. त्यामुळे त्यांना ‘झेंडामंत्री’ असे नामाकरणसुद्धा करण्यात आले. गोंदिया जिल्ह्याचे सर्वाधिक काळ पालकमंत्री राहिलेले अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर युतीच्या काळात जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेले राजकुमार बडोले यांनी शेवटच्या सहा महिन्यांत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. युती सरकारच्या काळात भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा अस्तित्वात आला. पहिले पालकमंत्री महादेवराव शिवणकर हे होते. त्यानंतर राजकुमार बडोले हे मूळ जिल्ह्यातील पालकमंत्री झाले.

तब्बल १४ वर्षांनंतर मिळाले होते मूळ जिल्ह्यातील पालकमंत्री

२०१४ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले. तेव्हा अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले राजकुमार बडोले सामाजिक न्यायमंत्री झाले. त्यांना गोंदियाचे पालकमंत्री करण्यात आले. १४ वर्षांनंतर मूळ जिल्ह्यातील व्यक्ती पालकमंत्री झाले होते. मात्र त्यांना शेवटच्या सहा महिन्यांत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर डॉ. परिणय फुके यांना गोंदियाचे पालकमंत्रिपद मिळाले होते. सहा महिन्यांनंतर विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आणि पुन्हा गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी अनिल देशमुख यांच्याकडे आली.

सर्वाधिक पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचेच

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या सत्ताकाळात अनिल देशमुख गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री होते. जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सांभाळणारे अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. देशमुखांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवाब मलिक यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले. मात्र तेदेखील मंत्रिपदावरून पायउतार झाल्याने मविआ सरकार असेपर्यंत प्राजक्त तनपुरे पालकमंत्री होते. त्यानंतर मागील वर्षी ३० जून रोजी राज्यात सत्तांतर झाले. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे गोंदियाचे पालकमंत्रिपद आले. सरकारची वर्षपूर्ती झाली असताना पुन्हा सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाला. तेव्हापासून नव्या पालकमंत्र्याची जिल्ह्याला प्रतीक्षा होती.

आत्राम यांच्याकडून जिल्हावासीयांना अपेक्षा

शासनाने ४ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या यादीनुसार अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व आल्याने चार वर्षांत पाच पालकमंत्री गोंदिया जिल्ह्याला लाभले असून त्यांच्याकडून जिल्हावासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Web Title: Gondia district got five guardian ministers in four years; Now the guardianship goes to Dharmarao Baba Atram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.