Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यात आले २२१ विदेशी प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 10:54 AM2020-03-29T10:54:26+5:302020-03-29T10:55:24+5:30
गोंदिया जिल्ह्यात शनिवारपर्यंत (दि.२८) २२१ प्रवासी विविध देशातून प्रवास करून जिल्ह्यात आलेले आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात शनिवारपर्यंत (दि.२८) २२१ प्रवासी विविध देशातून प्रवास करून जिल्ह्यात आलेले आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून विदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तींची आणि त्यांच्या संपर्कांत आलेल्या व्यक्तीची आरोग्य तपासणी करून त्यांचे अलगीकरण व विलगीकरण करण्यात येत आहे. विदेशी प्रवास करून आलेल्या २२१ व्यक्तींच्या संपर्कात ९९५ व्यक्ती आढळून आल्यामुळे या व्यक्तींचे वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण करण्यात आले होते.
त्यापैकी ९८ विदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तींचा व त्यांच्या संपकार्तील ३५९ व्यक्तींचा चौदा दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी संपलेला आहे. शनिवारपर्यंत विदेशातून आलेल्या १२३ प्रवासी व्यक्ती व त्यांच्या संपर्कात आलेल्या ६३६ व्यक्ती अलगीकरणामध्ये त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी आहेत. हे सर्व व्यक्ती प्रशासनाच्या देखरेखीखाली आहेत. १३ व्यक्ती विलगीकरणामध्ये आणि ८ व्यक्तींना शासकीय अलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने १४ नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून १२ नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. एक नमुना पॉझिटिव्ह आलेला आहे तर दोन नमुन्याचा अहवाल अप्राप्त असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक गोंदिया यांनी दिली.