जिल्ह्यात ८६३ पालकांना मिळाली ‘गुड न्यूज’, आता प्रत्यक्ष प्रवेशाची लगबग

By कपिल केकत | Published: April 20, 2023 06:09 PM2023-04-20T18:09:37+5:302023-04-20T18:11:19+5:30

मोबाइलवर आले एसएमएस

Gondia district has 864 seats to be filled under RTE, so far 863 parents have received SMS | जिल्ह्यात ८६३ पालकांना मिळाली ‘गुड न्यूज’, आता प्रत्यक्ष प्रवेशाची लगबग

जिल्ह्यात ८६३ पालकांना मिळाली ‘गुड न्यूज’, आता प्रत्यक्ष प्रवेशाची लगबग

googlenewsNext

गोंदिया : आरटीई प्रवेशासाठी ५ एप्रिल रोजीच ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली व त्यानंतर १२ एप्रिलपासून पालकांना एसएमएस पाठविण्यात आले. यामुळे सर्वच पालकांचे लक्ष मोबाइलकडे लागून होते. अशात जिल्ह्यातील ८६३ पालकांना मोबाइल एसएमएसच्या माध्यमातून ‘गुड न्यूज’ मिळाली आहे. यानंतर आता या पालकांना कागदपत्रांची पडताळणी करून मिळालेल्या शाळेत प्रत्यक्ष प्रवेश करावयाचा आहे. म्हणजेच, आता त्यांची प्रवेशासाठी लगबग वाढणार आहे.

शिक्षणापासून एकही मूल वंचित राहू नये, यासाठी शासनाने शिक्षणाचा सक्तीचा अधिकार आणला आहे. याअंतर्गत गरजू-गरीब घटकातील मुलांनाही इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेता यावे, यासाठी २५ टक्के जागांचे आरक्षण करण्यात आले आहे. मात्र, यासाठी पालकांना अर्ज करावे लागत असून, लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

या शैक्षणिक सत्रासाठी जिल्ह्यातील १३१ शाळांमध्ये ८६४ जागा आरक्षित असून, त्यासाठी ३९५९ अर्ज आले आहेत. अशाप्रकारे संपूर्ण राज्यासाठी ५ एप्रिल रोजी लॉटरी काढण्यात आली. अशात पालक आपल्या मुलांचा नंबर लागतो की नाही, यासाठी ‘एसएमएस’ची वाट बघत होते. मात्र, हे एसएमएस १२ एप्रिलपासून पाठविण्यात आले असून, यामध्ये जिल्ह्यात ८६३ पालकांना हे एमएसएस पाठविण्यात आल्याची माहिती आहे. जिल्ह्याला ८६४ जागा आरटीईअंतर्गत भरावयाच्या असून, आतापर्यंत ८६३ पालकांना एसएमएस आला म्हणजे फक्त एकच जागेसाठी एसएमएस आलेला नसल्याचे दिसते.

जिल्ह्यात आले ३९५९ अर्ज

जिल्ह्यात यंदा आरटीईसाठी १३१ शाळांनी नोंदणी केली असून, ८६४ जागांसाठी ३९५९ अर्ज आले आहेत. लॉटरी लागल्यानंतर १२ एप्रिलपासून एसएमएस पाठविण्यात आले. यात ८६३ पालकांना एसएमएस मिळाले असून, आता त्यांना कागदपत्रांची पडताळणी करून शाळेत प्रत्यक्ष प्रवेश घेणे गरजेचे आहे. यामुळे आता पालकांना प्रत्यक्ष प्रवेशासाठी घाई करावी लागणार आहे.

गोंदिया तालुक्यात सर्वाधिक अर्ज

- जिल्ह्यात ‘आरटीई’साठी एकूण ३९५९ अर्ज आहेत. यामध्ये गोंदिया तालुका आघाडीवर असून, येथे सर्वाधिक २०२५ क्रमांकावर तिरोडा तालुका असून, ६२२ अर्ज आले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आमगाव तालुका असून, तेथे ४०७ अर्ज आले असून, सर्वात कमी ११७ अर्ज सालेकसा तालुक्यात आले आहेत.

प्रवेशाची तारीख वाढण्याची शक्यता

- एसएमएस आल्यानंतर पालकांना तालुकास्तरावर कागदपत्र पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून घ्यायची असून, त्यांना याबाबतची पावती दिली जाणार आहे. ती पावती घेऊन संबंधित शाळेत २५ तारखेपर्यंत प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचा आहे. मात्र, पोर्टलमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचण येत असल्यामुळे कित्येक पालकांना तेथून पत्रही काढता आलेले नाही. अशात २५ तारखेपर्यंत प्रत्यक्ष प्रवेश घेणे कठीण जाणार आहे. अशात पोर्टलमधील तांत्रिक अडचण बघता शासनाकडून प्रवेशाची तारीख आणखी पुढे वाढवून दिली जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे पालकांना तेवढाच दिलासा मिळणार आहे.

अशी आहे तालुकानिहाय अर्जांची आकडेवारी

तालुका- शाळा - जागा -अर्ज
आमगाव- ११-८९-४०७
अर्जुनी-मोरगाव- १३-८८-१८२
देवरी-०७-४६-१२४
गोंदिया-५०-३५४-२०२५
गोरेगाव- १५-६०-३०६
सडक-अर्जुनी- १०-४८-१७६
सालेकसा-०५ -४४- ११७
तिरोडा- २०- १३५- ६२२
एकूण-१३१- ८६४- ३९५९

Web Title: Gondia district has 864 seats to be filled under RTE, so far 863 parents have received SMS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.