गोंदिया जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वात कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:20 AM2021-06-19T04:20:14+5:302021-06-19T04:20:14+5:30
राज्य शासनाने कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने लॉकडाऊन शिथिल करीत ७ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु केली. १० टक्केच्या आत ...
राज्य शासनाने कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने लॉकडाऊन शिथिल करीत ७ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु केली. १० टक्केच्या आत कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्के पेक्षा कमी ऑक्सिजन बेडची संख्या असलेल्या जिल्ह्यांचा अनलॉकच्या पहिल्या स्तरात समावेश करण्यात आला होता. गोंदिया जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ५ टक्केच्या आत आणि ऑक्सिजन बेड सुध्दा केवळ २ टक्के भरले असल्याने अनलॉकच्या पहिल्याच स्तरात समावेश करण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार ७ जूनपासून पूर्ववत सुरळीत सुरु करण्यात आले. ७ ते १८ जूृन या कालावधीत सुध्दा गोंदिया जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा कमी झाला आहे. राज्य शासनाने गुरुवारी (दि.१७) जाहीर केेलेल्या विकली अहवालात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.२७ टक्के आहे. या कालावधीत एकूण २३ हजार ७४८ स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात एकूण ६४ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या चारपट आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
............
सहा जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट होतोय कमी
कोरोनाचा संसर्ग जरी आटोक्यात असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेट वर आरोग्य विभाग आणि शासनाची बारीक नजर आहे. त्यामुळेच दर आठवड्याला याचा आढावा घेतला जात आहे. या आठवड्यात गोंदिया पाठोपाठ चंद्रपूर ०.६२, भंडारा ०.९६, जळगाव ०.९५, नागपूर १.२५, परभनी ०.९४ , वर्धा १.१२ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे.
..............
सर्वाधिक पॉझिटिव्हिटी कोल्हापुराचा
आरोग्य विभागाने गुरुवारी कोरोनाचा विकली पॉझटिव्हिटी रेट जाहीर केला. त्यात राज्यात सर्वात कमी ०.२७ टक्के पॉझिटिव्हिटी रेट गोंदियाचा आहे. तर सर्वाधिक १३.७७ टक्के पॉझिटिव्हिटी कोल्हापूर जिल्ह्याचा आहे. तर त्या पाठोपाठ १२.७७ टक्के पॉझिटिव्हिटी रेट रायगड जिल्ह्याचा आहे.