गोंदिया जिल्ह्यात नऊ दिवसात वाढले २४३३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 10:51 AM2020-09-26T10:51:37+5:302020-09-26T10:51:59+5:30

गोंदिया शहरात मागील तीन दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा दररोज ३०० वर निघत आहे.

In Gondia district, the number of patients increased by 2433 in nine days |  गोंदिया जिल्ह्यात नऊ दिवसात वाढले २४३३ रुग्ण

 गोंदिया जिल्ह्यात नऊ दिवसात वाढले २४३३ रुग्ण

Next
ठळक मुद्दे३५ कोरोना बाधितांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग झपाटयाने वाढत असून जिल्ह्यात तिनशेचा पाढा सुरू झाला आहे. मागील तीन दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा दररोज ३०० वर निघत आहे. तर सर्वाधिक रुग्ण हे गोंदिया शहरात आढळत आहे. शुक्रवारी (दि.२५) सुध्दा जिल्ह्यात ३३२ कोरोना बाधितांची नोंद झाली तर पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे वेळीच सावध होत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. अन्यथा परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना तुम्हाला बाहेर पडण्यापासून थांबविण्यापूर्वी तुम्हीच त्याला हद्दपार करण्याचा संकल्प करा.

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ आहे. दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यात दररोज दीडशे कोरोना बाधितांची नोंद होत होती. तर मागील नऊ दिवसांपासून त्यात वेगाने वाढ झाली आहे. आता तिनशे रुग्ण आढळत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा तिनशेचा पाढा सुरू झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात १६ ते २५ सप्टेंबर दरम्यान २४३३ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. नऊ दिवसांच्या कालावधी ३५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मागील नऊ दिवसात सरासरी दररोज २८७ कोरोना बाधित आढळत आहेत तर ४ कोरोना बाधितांचा मृत्यू होत आहे. कोरोना बाधितांचा ग्राफ दररोज वाढत असल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली असून आरोग्य यंत्रणेवरील ताण सुध्दा वाढला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सुध्दा आता स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. याकडे थोडेही दुर्लक्ष करणे आता नागरिकांनाच महाग पडू शकते. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, मास्कचा नियमित वापर करावा, गर्दीच्या ठिकाणीे जाणे टाळावे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा तसेच आरोग्य विभागाने सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोना संसर्ग वाढू न देणे हे आता नागरिकांच्याच हाती आहे.

 नमुन्यांची संख्या वाढली
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कोरोना चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत दररोज केवळ ३५० स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून दररोज दोन हजारावर स्वॅब नमुन्यांचा अहवाल राहत आहे. अन्यथा कोरोना बाधितांचा आकडा अधिक वाढला असता. त्यामुळे आता आणखी एक आरटीपीसीआर मशिन लावण्यात येणार आहे.

अहवालास विलंब, संसर्ग वाढीस मदत
बºयाच लोकांना कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसल्यास ते मेडिकलच्या प्रयोगशाळेत स्वॅब नमुने तपासणीसाठी जात आहे. मात्र स्वॅब नमुने तपासणीचा अहवाल चार ते पाच दिवसानंतर प्राप्त होत आहे. त्यामुळे या कालावधी ते अनेकांच्या संपर्कात येत असून यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्यास मदत होत आहे. त्यामुळे स्वॅब नमुने तपासणीचा अहवाल २४ तासात मिळणे गरजेचे आहे.

Web Title: In Gondia district, the number of patients increased by 2433 in nine days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.