गोंदिया जिल्ह्यात आणखी सात कोरोना बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 01:41 PM2020-07-11T13:41:49+5:302020-07-11T13:42:10+5:30
गोंदिया जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आज आणखी सात कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. विदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आज आणखी सात कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. यात गोंदिया कुंभारेनगर येथील एक आणि तिरोडा तालुक्यातील एक व गुजरात आणि विदेशातून परतलेल्या पाच जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र सात कोरोना बाधित आज कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सध्या एकूण ५८ कोरोना अँक्टीव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २०९ कोराना बाधितांची नोंद झाली आहे. तर १४९ कोरोना बाधित आतापर्यंत कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच तिरोडा तालुक्यातील एका कोरोना बाधिताचा आज सकाळी तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णाला शुक्रवारी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरु असताना त्याचा आज सकाळी मृत्यू झाला. त्याच्या स्वँब नमुन्याचा अहवाल कोरोना पाझिटिव्ह आला आहे. याला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. जिल्ह्यात यापूर्वी दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. गोंदिया आणि सडक अर्जुनी तालुक्यातील रुग्णाचा समावेश होता. तर आज तिरोडा तालुक्यातील एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या आता तीनवर पोहचली आहे.