कोरोनाचे रुग्ण बरे होण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 07:47 PM2020-07-23T19:47:14+5:302020-07-23T19:48:36+5:30
गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: देशात आणि राज्यात कोरोना विषाणुचा संसर्ग वेगाने वाढत आहे. जिल्हयात देखील त्या प्रमाणात कोरोनाचे बाधित रुग्ण आढळून येत आहे. तरीसुद्धा गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. जिल्हयात गुरुवारी एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३९ असून त्यापैकी २१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सहा रुग्णांना नागपूर येथे पुढील उपचारासाठी दाखल केले होते. यातील एक रुग्ण नागपूर येथून बरा होऊन घरी परतल्यामुळे एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या २१४ झाली आहे.
गोंदिया जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८९.५ टक्के इतका असून महाराष्ट्रात अव्वल असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भूषणकुमार रामटेके यांनी दिली.
बाहेर राज्यातून किंवा जिल्हयातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पोलिस आणि आरोग्य विभागाची नजर आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची ताबडतोब संपर्क तपासून करून त्यांची माहिती घेणे देखील महत्वाचे कामे आहेत. तसेच संशयितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करुन त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करणे किंवा गृह विलगीकरण करणे या गोष्टींचे नियोजन महत्वाचे ठरले आहे.
जिल्ह्यातील प्रयोगशाळा चाचणी अहवालात बाधित २३० तर रॅपिड अँटिजेन चाचणीत पाच रुग्ण आढळले. जिल्ह्यातील चार रुग्णांची बाहेर जिल्ह्यात व राज्यात झाली.यामध्ये तीन रुग्णांची चाचणी नागपूर येथे तर एका रुग्णाची चाचणी बंगलोर येथे करण्यात आली आहे.या चारही रुग्णांचा समावेश जिल्ह्यात करण्यात आल्यामुळे एकूण बधितांची संख्या २३९ इतकी झाली आहे.
कोविड-१९ कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात अव्वल असून जिल्हावासियांसाठी ही मोठी दिलासा देणारी बाब आहे.
जिल्हयातील नागरिकांना आजाराची कोणतीही लक्षणे असल्यास तात्काळ त्यांनी आरोग्य हेल्पलाईन क्रमांकावर 8308816666 / 8308826666 संपर्क करावा किंवा प्रशासनाला या बाबतची माहिती द्यावी.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.