गोंदिया जिल्ह्यात २२ हजार हेक्टरमधील धानपिकाला अवकाळीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 02:19 PM2019-04-17T14:19:15+5:302019-04-17T14:21:32+5:30
गोंदिया जिल्ह्यात धान पिकाची स्थिती चांगली असताना मागील दोन दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा धानाला फटका असून शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामानंतर उन्हाळी धानाची लागवड केली जाते. यंदा २२ हजार हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली आहे. धान पिकाची स्थिती चांगली असताना मागील दोन दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा धानाला फटका असून शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने पूर्व विदर्भात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सोमवारी आणि मंगळवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिणामी वातावरणात अचानक बदल झाल्याने त्याचा पिकांवर परिणाम झाला आहे. वादळी पावसामुळे सर्वाधिक फळबागांचे नुकसान झाले. आब्यांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसला.गोंदिया जिल्ह्यात खरीपात १ लाख ७८ हजारावर तर रब्बीमध्ये ४६ हजारावर धानाची लागवड केली जाते. खरीप व रब्बी हंगामातील धान निघाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. ते शेतकरी उन्हाळी धानाची लागवड करतात. यंदा जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली. धान पिकासाठी अनुकुल वातावरण मिळाल्याने धान पीक जोमात आले होते.मात्र सोमवार आणि मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाचा उन्हाळी धानाला फटका बसला. तर ढगाळ वातावरण असल्याने धान पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने सुध्दा पुन्हा दोन तीन दिवस ढगाळ वातावरण राहिल्यास कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. खरीप व रब्बीनंतर शेतकरी वर्षभराचा खर्च भरुन काढण्यासाठी उन्हाळी धानाची लागवड करतात. याची शेतकऱ्यांना बरीच मदत होत असते. मात्र अवकाळी पाऊस आणि कीडरोगांमुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
फळबागांना फटका
अवकाळी पाऊस आणि वादळाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील आंब्याच्या बागांना बसला आहे. वादळामुळे आंब्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून बागधारकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.
ढगाळ वातावरणामुळे धानावर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तर अवकाळी पावसामुळे धानासह इतर पिकांना फटका बसू शकतो.
- नंदकिशोर नयनवाड, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.