गोंदिया जिल्ह्याच्या व्याघ्रप्रकल्पातील पाणवठे पडले कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 05:50 PM2018-04-27T17:50:00+5:302018-04-27T17:50:10+5:30
मागील महिनाभरापासून नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांच्या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे भटकत असल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील महिनाभरापासून नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांच्या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे भटकत असल्याची माहिती आहे. मात्र या प्रकारामुळे वन्यप्राणी धोक्यात आल्याचे चित्र आहे.
सडक-अर्जुनी तालुक्याला लागूनच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सिमा लागून आहे. तालुक्याच्या दक्षिण दिशेला असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ आहे. हा राष्ट्रीय महामार्ग वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. मागील १५ दिवसांपूर्वी तीन विविध घटनेत वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला. व्याघ्र प्रकल्पाला लागून देवपायली बाम्हणी, डोंगरगाव-डेपो, डुग्गीपार, कोहमारा, बकी, मेंडकी, कोसबी, चिखली, कोलारगाव, कोसमघाट, मनेरी, कनेरी, खोबा, कोकणा-जमी, परसोडी, गोंडीखोबा, मोगरा, मंदीटोला, खडकीटोला, मुगानझोखा ही गावे व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत. व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी उन्हाळ्यात दिवसात पाण्याचा शोधात गावाकडे कुच करतात. दरम्यान बरचदा रस्ता पार करताना वाहनाच्या धडकेत वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे. मागील तीन महिन्यात जवळपास दहा ते बारा वन्यप्राण्यांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नदी, नाले कोरडे पडले आहे. जंगलातील पाणवठे सुध्दा कोरडे पडल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे वन्यजीव प्रेमीनी लोकमतशी बोलताना सांगितले.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात तीन वनपरिक्षेत्र कार्यालये आहेत.त्यात डोंगरगाव, बोंडे, नवेगावबांध हे आहेत. डोंगरगाव वनपरिक्षेत्रात ७ बिट आहेत. तर बोडे वनपरिक्षेत्रात ८ बिट आहेत. नवेगाव वनपरिक्षेत्रात ४ वनक्षेत्र सहाय्यक आहेत. त्यात कोकणा, कोसबी, निशानी, पवनी हे आहेत. नवेगाव वन परिक्षेत्रात १३ हजार हेक्टर आर क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. तर पर्यटकांना वनात वनभ्रमंती करण्यासाठी बकी, खोली व जांभळी गेट आहे. या गेटवरुन पर्यटकांना आत व्याघ्र प्रकल्पात जाण्यासाठी खुला केला आहे. नवेगाव येथे १३ बिटांची निर्मिती केली आहे.
शिकारीच्या घटनांमध्ये वाढ
प्राण्यांना पाणी पिण्यासाठी डोंगरगाव वनपरिक्षेत्रात १२ बोअरवेल आहेत. तर बोंडे वन परिक्षेत्रात ११ बोअरवेल आहेत. या बोअरवेलसह नैसर्गिक झरे आहेत.यावर्षी पाण्याचे दुर्भीक्ष असल्यामुळे व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक झरे कोरडे पडल्याचे चित्र आहे. वन्य प्राण्यांना पुरेस पाणी मिळत नसल्याने ते गावाच्या दिशेने कुच करित आहे. तर याचा फायदा शिकारी घेत असल्याचे चित्र आहे. वन्यजीव विभागाने जास्तीत-जास्त सौर उर्जेवर सोलरपंप बसवून प्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्याची गरज आहे.
या परिसरात वन्य प्राण्याचा वावर
दोन वर्षांपूर्वी व्याघ्र प्रकल्पातील काळीमाटी, कवलेवाडा, झलकारगोंदी या गावांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळे या भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढून त्यांच्या संख्येत सुध्दा वाढ झाली. या भागात निलगाय, हरिण आदी प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो असे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आगीच्या घटनांमध्ये वाढ
या परिसरातील जंगलामध्ये तेंदूपत्त्याचे प्रमाण अधिक आहे. दरवर्षी तेंदूपत्ता हंगामा दरम्यान तेंदू हंगाम चांगला येण्यासाठी तेंदूपत्ता कंत्राटदार जंगलात आग लावतात. यंदा देखील या परिसरातील जंगलात आग लावल्यामुळे शेकडो हेक्टरमधील वनसंपदेचे नुकसान झाले. शिवाय त्याची झळ वन्य प्राण्यांना बसली. दिवसेंदिवस जंगलातील आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.