मध्यप्रदेशाच्या रॉयल्टीवर गोंदियातून रेतीचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 11:48 PM2018-07-04T23:48:46+5:302018-07-04T23:49:30+5:30
जिल्ह्यात रेती माफियांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढ चालले आहे. मध्यप्रदेशातील रॉयल्टी दाखवून सर्रासपणे जिल्ह्यातील रेती घाटांवरुन रेतीचा उपसा सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात रेती माफियांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढ चालले आहे. मध्यप्रदेशातील रॉयल्टी दाखवून सर्रासपणे जिल्ह्यातील रेती घाटांवरुन रेतीचा उपसा सुरू आहे. हा प्रकार मागील दोन तीन महिन्यांपासून सुरू असून प्रशासनाने केवळ बघ्याची भुमिका घेतली असल्याने लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी फेरले जात आहे.
तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा रेती घाट क्रमांक २ वरुन सर्रासपणे पोकलॅनने रेतीचा उपसा केला जात असल्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणला. त्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली. तिरोडा तालुक्यातून धापेवाडा मार्गे मध्यप्रदेशात जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे रेतीसह अन्य सामानाची तस्करी करणारे याच मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे या परिसरातील रेती घाटावर मध्यप्रदेशातील रेती माफियांचे प्रस्थ वाढले आहे. घाटकुरोडा येथील रेती घाटावरुन दररोज शेकडो ट्रक रेतीची वाहतूक केली जाते. नदीपात्रातून रेतीचा उपसा करण्यासाठी पोकलॅनचा वापर करता येत नाही. जेवढ्या रेतीचा उपसा करण्याची रॉयल्टी घेतली आहे तसेच ज्या घाटाचा लिलाव झाला त्याच घाटावरुन रेतीचा उपसा करता येतो. मात्र रेती माफियांनी हे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमर्जीनुसार नदीपात्रातून रेतीचा उपसा करीत असल्याचे चित्र आहे. घाटकुरोडा येथील रेतीची मध्यप्रदेशात वाहतूक करताना या वाहनाची तपासणी केल्यास रेती माफिया कारवाई टाळण्यासाठी मध्यप्रदेशातील रॉयल्टी दाखवित असल्याची माहिती आहे. ही बाब स्थानिक महसूल अधिकाºयांना सुध्दा माहिती आहे. मात्र अद्यापही त्यांनी एकाही वाहनावर कारवाई केली नाही. त्यामुळे रेती माफियांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
स्थानिक प्रशासनाच्या मौनावर प्रश्नचिन्ह
तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा येथील रेती घाटावरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरु आहे. तसेच पोकलॅन लावून उपसा केला जात असताना स्थानिक प्रशासन मात्र असा काहीच प्रकार सुरु नसल्याचे सांगत आहे. लोकप्रतिनिधीनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या मौनाचे नेमके कारण काय असा सवाल या परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे.
भरारी पथक तयार करणार
घाटकुरोडा येथील रेती घाटावर सुरु असलेला अनागोंदी कारभार लोकमतने पुढे आणल्यानंतर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. रेती माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी भरारी पथक तयार करुन कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
रेती घाटालगत रेतीचे ढिगारे
सर्वसामान्य नागरिकांनी घराच्या बांधकामासाठी दोन तीन ट्रक रेतीचा स्टॉक करुन ठेवल्यास महसूल विभागाचे अधिकारी त्याच्या घरी जावून लगेच चौकशी सुरु करतात. मात्र घाटकुरोडा येथील दोन्ही रेती घाटावर किमान वर्षभर पुरवठा करता येईल ऐवढ्या मोठ्या प्रमाणात घाटालगत रेतीचा स्टॉक करुन ढिगारे उभारले आहे. मात्र त्यांची चौकशी कुणी करीत नसल्याचे घोगरा येथील गावकऱ्यांनी सांगितले
सीसीटीव्ही घाटांपासून दूरच
रेती घाटांवरुन रेतीचे अवैध उत्खनन थांबविण्यासाठी शासनाने रेती घाटांवर सीसीटीव्ही तसेच द्रोणच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण, या निणर्याची जिल्हा महसूल विभागाने अद्यापही अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे रेती घाटावरुन रेतीचा अवैध उपसा सर्रासपणे सुरू असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.