Gondia: मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील अनेक वस्त्यांमध्ये साचले पाणी
By अंकुश गुंडावार | Published: September 10, 2024 11:22 AM2024-09-10T11:22:19+5:302024-09-10T11:22:47+5:30
Flood In Gondia City: गोंदिया जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्य़ात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची तांराबळ उडाली होती.
गोंदिया - जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्य़ात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची तांराबळ उडाली होती.
शहरातील फुलचूर परिसरात नाल्यालगत असलेले एक घर कोसळल्याने त्याखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. तर देवरी तालुक्यातील लोहारा येथील नाल्यात एक ट्रक वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली. गोंदिया, देवरी, सालेकसा, आमगाव या तालुक्यात मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर पुजारीटोला, कालीसरार, सिरपूरबांध धरणाचे सर्व दवाजे उघडण्यात आले असून प्रशासनाने आरेंज अलर्ट दिला आहे. धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. या चारही तालुक्यातील दहा ते पंधरा मार्ग बंद झाले आहे. तर प्रशासनाने नदी काठालगतच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात बिकट पूर परिस्थिती निर्माण होवू शकते.
शेकडो घरांची पडझड
जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली आहे. तर सालेकसा आणि देवरी तालुक्यातील काही गावांमध्ये पुराचे पाणी साचल्याने सामानांचे सुध्दा नुकसान झाल्याची माहिती आहे.
गोंदिया शहरातील वस्त्यांमध्ये साचले पाणी
नगर परिषदेने पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांचा उपसा न केल्याने सोमवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. तर काही नागरिकांच्या घरात पाणी साचल्याने त्यांची तारांबळ उडाली होती. तर अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र होते.