लोकमान्य उत्सवाला गोंदिया शिक्षण विभागाचा ‘खो’

By admin | Published: September 14, 2016 12:22 AM2016-09-14T00:22:56+5:302016-09-14T00:22:56+5:30

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरु केलेल्या गणेश उत्सवाच्या परंपरेत सामाजिक विषयांवर जनजागृती व्हावी

Gondia Education Department's 'Kho' | लोकमान्य उत्सवाला गोंदिया शिक्षण विभागाचा ‘खो’

लोकमान्य उत्सवाला गोंदिया शिक्षण विभागाचा ‘खो’

Next

देवरीत चार मंडळांचा सहभाग : अर्ज करुनही स्पर्धेतून डावलले?
देवरी : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरु केलेल्या गणेश उत्सवाच्या परंपरेत सामाजिक विषयांवर जनजागृती व्हावी या उद्देशाने यावर्षी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत लोकमान्य उत्सव साजरा करण्याचे ठरविले. त्या अनुषंगाने केलेल्या आवाहनानुसार नवयुवक किसान गणेश मंडळ देवरी यांनी व इतर तीन मंडळांनी अर्ज सादर केला होता. परंतु शिक्षण विभागाने चुकीची माहिती देत देवरी तालुक्याचा एकाही मंडळाचा सहभाग नसल्याचे कळविले. यामुळे आपण स्पर्धेत सहभागी आहोत किंवा नाही या संभ्रमात गणेश मंडळ असून शिक्षण विभागाप्रती नाराजी व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे यंदापासून स्वदेशी साक्षरता, बेटी बचाओ व व्यसनमुक्ती व जलसंवर्धन या विषयांवर देवरी तालुक्यातील नवयुवक किसान गणेश मंडळ, ओम जय जगतगुरु मंडळ चारभाटा, इंदिरा महिला विकास सार्वजनिक मंडळ टेकाबेदर, न्यू बाल गणेश मंडळ वडेगाव या चार गावातील मंडळांनी स्पर्धेत सहभाग घेऊन वरील विषयांवर जनजागृती करीत पोस्टर बॅनर, स्वच्छता अभियान राबवून आर्थिक नुकसान सहन करीत सहभाग घेतला. परंतु शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देवरी तालुक्याचा या स्पर्धेत सहभाग नाही.
शिक्षण विभागाच्या या उदासीन कारभारामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला असून आम्ही केलेली मेहनत वाया तर जाणार नाही, या संभ्रमात मंडळाचे कार्यकर्ते आहेत. रितसर अर्ज करुनही स्पर्धेतून नाव वगळण्यात आले असेल तर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गणेश मंडळांकडून केली जात आहे.
याबाबत गटविकास अधिकारी व्ही.पी. कोळेकर यांना माहिती विचारली असता देवरी तालुक्यातील चार मंडळांनी अर्ज सादर केला असून त्याचा अर्ज आम्ही शिक्षण विभाग गोंदियाला पाठविलेला आहे. जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने चुकीची माहिती पुरविली. त्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे, परंतु तालुक्याचे चारही गणेश मंडळ स्पर्धेत सहभागी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Gondia Education Department's 'Kho'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.