Gondia: गुलाबी थंडीत निवडणुकांमुळे तापले वातावरण, उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात
By कपिल केकत | Published: October 28, 2023 08:17 PM2023-10-28T20:17:37+5:302023-10-28T20:17:53+5:30
Gondia News: हिवाळ्याला सुरुवात झाली असून, गुलाबी थंडीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असतानाच ग्रामपंचायत निवडणुकांमुळे मात्र वातावरण तापले आहे. येत्या दि. ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्यामुळे उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
- कपिल केकत
गोंदिया - हिवाळ्याला सुरुवात झाली असून, गुलाबी थंडीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असतानाच ग्रामपंचायत निवडणुकांमुळे मात्र वातावरण तापले आहे. येत्या दि. ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्यामुळे उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारांच्या भेटीगाठीवर ते जोर देत असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक, तर दहा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होत आहेत. यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा टप्पा आटोपला असून, निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नवरात्रीमुळे गावकऱ्यांचे लक्ष निवडणुकीकडे तेवढे लागले नव्हते व त्यामुळे काही हालचाल दिसून येत नव्हती. मात्र आता नवरात्र आटोपले असून, येत्या दि. ५ नोव्हेंबर मतदान घेतले जाते. जेमतेम आठ दिवसांवर मतदान आले असल्याने आता उमेदवारांनीही मैदानात उतरून प्रचाराला सुरुवात केली आहे. यामध्ये संरपचपदासाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांना अवघ्या गावकऱ्यांशी संपर्क साधावयाचा आहे, तर सदस्यपदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना आपल्या वॉर्डातील नागरिकांची भेट घ्यावी लागत आहे. यामुळे ते एक-एक व्यक्तीच्या भेटीवर जोर देत आहेत. त्यांच्या प्रचाराला सुरुवात झाल्यामुळे; मात्र गावागावांतील राजकीय वातावरणही तापले आहे.
सार्वत्रिक निवडणुकीतील गावांमध्ये चुरस
- जिल्ह्यातील फक्त चार ग्रामपंचायतीसाठीच सार्वत्रिक निवडणूक घेतली जात आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील माकडी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी-देवलगाव, आमगाव तालुक्यातील जांभूरटोला; तर सडक-अर्जुनी तालुक्यातील श्रीरामनगर ग्रामपंचायतचा समावेश आहे. येथे सरपंच व सदस्य अशी संपूर्ण बॉडी निवडली जाणार असल्याने या गावांमध्ये निवडणुकीला घेऊन उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. विजय आपल्या पदरीच लागला पाहिजे यासाठी उमेदवारांकडून प्रचार जोमात सुरू आहे. परिणामी गावांमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे.
शेकोटीवर निवडणुकीच्याच चर्चा
- मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. रात्री तर घराबाहेर गरम कपड्यांची गरज पडत आहे. त्यात ग्रामीण भागात मात्र थंडीचा जास्त जोर राहतो. अशात गावकरी शेकोटी पेटवून अवती-भवती बसून गप्पा मारत आग शेकतात. सध्या ग्रामपंचायत निवडणुका असल्याने निवडणूक असलेल्या व लगतच्या गावांमध्ये मात्र शेकोटीवर फक्त निवडणुकांचीच चर्चा असून कोण बाजी मारणार व कोण पडणार याची आकडेमोड सुरू आहे.
निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतचा तक्ता
तालुका - ग्रामपंचायत- उमेदवार
गोंदिया - माकडी- २ (सरपंच)- १४ सदस्य
आमगाव- जांभूरटोला- वडद--- २ (सरपंच)- १६ (सदस्य)
सडक-अर्जुनी - श्रीरामटोला---२(सरपंच)
अर्जुनी-मोरगाव- येरंडी-देवलगाव- कुंभीटोला- ३ (सरपंच)
देवरी- मेहताखेडा, कन्हाळगाव, बोरगाव-बा.---- १ (सदस्य)
गोरेगाव- पिंडकेपार---२ (सदस्य)
तिरोडा - बोरगाव, चुरडी ---३ (सदस्य)
सालेकसा- तिरखेडा -पाऊलदौना--- २ सदस्य