Gondia: ...अखेर ‘त्या’ १६ शिक्षकांच्या मान्यता रद्द, शिक्षण सहसंचालकांचे आदेश, गोंदियातील नियमबाह्य शिक्षक भरती
By नरेश रहिले | Published: July 16, 2024 07:26 PM2024-07-16T19:26:12+5:302024-07-16T19:26:26+5:30
Gondia News: गोंदिया जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागामधील तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी कोरोना कालावधीत जिल्ह्यात नियमबाह्य व बेकायदेशीर शिक्षक मान्यता वर्ष २०१७ पासून २०२० मध्ये दिल्या होत्या.
- नरेश रहिले
गोंदिया - जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागामधील तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी कोरोना कालावधीत जिल्ह्यात नियमबाह्य व बेकायदेशीर शिक्षक मान्यता वर्ष २०१७ पासून २०२० मध्ये दिल्या होत्या. त्या मान्यता नियमबाह्य व बेकायदेशीर असल्यामुळे १ जुलै २०२४ रोजी शिक्षण सहसंचालकांनी (पुणे) शिक्षण उपसंचालकांचे (नागपूर) आदेश कायम करून सर्व १६ शिक्षकांच्या मान्यता रद्द केल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील या १६ शिक्षकांच्या मान्यता नियमबाह्य व बेकायदेशीर असल्यामुळे शिक्षण उपसंचालकांनी (नागपूर विभाग) नियुक्त्या रद्द केल्या होत्या. त्यामुळे व्यथित होऊन नुकतीच मान्यता रद्द झालेल्या कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात (नागपूर खंडपीठ) याचिका दाखल केली होती. शिक्षण उपसंचालकांनी मान्यता रद्द करताना संबंधित कर्मचाऱ्यांना सखोल कारणे दाखवा नोटीस न दिल्यामुळे मान्यता रद्द करण्याचे शिक्षण उपसंचालकांचे आदेश रद्द करून एक महिन्याच्या आत शिक्षण सहसंचालकांनी (पुणे) सुनावणी घ्यावी; तसेच एक महिन्याच्या आत सुनावणी घेतली नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित सुरू करावे, असे देखील आदेश दिले; परंतु शिक्षण सहसंचालकांनी दिलेल्या मुदतीच्या आत सुनावणी न घेतल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे आदेश देण्यात आले; परंतु नुकतेच १ जुलै २०२४ रोजी शिक्षण सहसंचालकांनी शिक्षण उपसंचालकांचे आदेश कायम करून सर्वच १६ शिक्षकांच्या मान्यता रद्द केल्या आहेत.
‘या’ कर्मचाऱ्यांच्या मान्यता रद्द
- मान्यता रद्द झालेल्या कर्मचाऱ्यांत विनोद हेमराज जगणे, जी.एम. हरीणखेडे (सेजगाव हायस्कूल, सेजगाव, ता. तिरोडा), एम.पी. समरीत, एस.पी.डोंगरे (गणेश हायस्कूल, गुमाधावडा, ता. तिरोडा), निशा विजयसिंग नागपुरे, (एसएसपीडी हायस्कूल, म्हसगाव, ता. गोरेगाव), दीपिका गुलाब दमाहे (स्वामी विवेकानंद हायस्कूल, सोनपुरी, ता. सालेकसा), कमलेश शालिकराम ठाकूर, संजय ग्यानीराम बिरनवार, (हरिदास भवरजार स्कूल, गणखैरा, ता. गोरेगाव), महेश शिवसागर बडोले, ममता जगतलाल अंबुले (फुलीचंद भगत हायस्कूल, कोसमतोंडी, ता. सडक-अर्जुनी), अनिता प्रेमलाल मेंढे, हिमाशी युगल मोहन (परशुराम विद्यालय, मोहगाव, ता. गोरेगाव), शालू धनराज कोटांगले, प्रियांका मुखरू शामकुळे (अमृताबेन पटेल हायस्कूल, रिसामा, ता. आमगाव), स्मिता प्रमोद कटरे (डॉ. आंबेडकर माध्यमिक विद्यालय, सरकारटोला, ता. आमगाव) यांचा समावेश आहे.