गोंदिया आगाराला रिक्त पदांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 09:37 PM2018-05-03T21:37:02+5:302018-05-03T21:37:02+5:30
गोंदिया आगाराला चालक-वाहकांच्या रिक्त पदांचा फटका बसत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारात ९२ बसेस उपलब्ध आहेत. १३४ चालक व ११५ वाहक कार्यरत आहेत. अशात सेवा उपलब्ध करून देण्यास आगार व्यवस्थापकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया आगाराला चालक-वाहकांच्या रिक्त पदांचा फटका बसत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारात ९२ बसेस उपलब्ध आहेत. १३४ चालक व ११५ वाहक कार्यरत आहेत. अशात सेवा उपलब्ध करून देण्यास आगार व्यवस्थापकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्याचा आर्थिक फटका आगाराला बसत आहे.
गोंदिया आगारासाठी १६० चालक व १६० वाहकांची पदे मंजूर आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे चालक व वाहकांना ओव्हरटाईम करावे लागत आहे. तसेच याच कारणामुळे कुठेकुठे राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासी सेवेवर परिणाम होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारात केवळ दोन शिवशाही बसेस सोडल्या तर अधिक बसेस भंगार झाल्या आहेत. काही बसेस कुठेही बंद होवून पडतात. त्यांच्या देखभाल दुरूस्तीची गरज आहे. काही बसेस तर एवढ्या भंगार झाल्या आहेत की त्यांना रस्त्यावर धावण्याचा कालावधी कधीचाच संपला आहे. अशा बसेसमुळे प्रवाशांना केवळ त्रासच होत नाही तर त्यांचा वेळ व पैसासुद्धा अकारण खर्च होतो. भंगार झालेल्या बसेस अद्यापही रस्त्यावर धावत असल्याने बरेचदा आगार व्यवस्थापकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. आगारातील रिक्त पदांची आणि भंगार बसेसची समस्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. मात्र अद्यापही ही समस्या मार्गी लागलेली नाही.
वर्षभरात आगाराला ४४ लाखांचे उत्पन्न
चालक-वाहकांचा अभाव असलेल्या गोंदिया आगाराला आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ४४.५१ लाखांचे उत्पन्न झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक इंगोले यांनी सांगितले. मार्च २०१८ मध्ये ३.२६ लाख व फेब्रुवारी २०१८ मध्ये १०.५० लाखांचे उत्पन्न झाले आहे. लग्न सराईच्या हंगामात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने उत्पन्नात वाढ करणे शक्य होत आहे.