गोंदियाच्या दवनीवाडा पोलीस ठाण्यात नवीन कायद्यांतर्गत पहिला अदखलपात्र गुन्हा दाखल
By नरेश रहिले | Published: July 1, 2024 03:16 PM2024-07-01T15:16:58+5:302024-07-01T15:34:01+5:30
ब्रिटिशकालीन भारतीय दंड विधान इतिहास जमा; १६ पोलीस ठाण्यात नविन कार्य प्रणालीचे सॉफ्टवेअर अद्यावत
गोंदिया: केंद्र सरकारने तीन नवीन फौजदारी कायदे संमत केले आहे. त्याची अंमलबजावणी १ जुलै २०२४ पासून करण्यात येणार आहे. या कायद्यामध्ये पोलीस तपासाची कार्यप्रणाली व प्रक्रियामध्ये काही बदल झाले आहेत. पहिल्याच दिवशी गोंदिया जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांपैकी दवनीवाडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व तपास अधिकारी व अंमलदार यांच्या गुन्हे अन्वेषण कामकाजामध्ये अचुकता व गतिमानता येण्यासाठी व गुन्हे दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्याकरीता हे कायदे महत्वाचे ठरणार आहेत. पोलीस ठाण्यामध्ये दाखल होणारे शरीराविरूध्दचे गुन्हे, महिला व बालकांविरूध्द घडणारे गुन्हे, मालमत्तेसंबंधी गुन्हे, आर्थिक गुन्हे, संघटित व किरकोळ संघटित गुन्हेगारी, दहशतवादी कृत्य तसेच अपघातासंबंधी गुन्ह्यांच्या कलमांमध्ये बदल करण्यात आला आहे. दवनीवाडा पोलीस ठाण्यांत भारतीय न्याय संहिता - २०२३ (बीएनएस) ची अंमलबजावणी करतांना पहिल्या अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
केंद्र सरकारने भारतीय दंड संहिता १८६० हा जुना कायदा रद्द करून भारतीय नागरीकांचे हित लक्षात घेऊन देशाचा नवीन कायदा म्हणून भारतीय न्याय संहिता, २०२३ (बीएनएस) २५ डिसेंबर २०२३ रोजी लागू करण्यात आला आहे. १ जुलै २०२४ पासून संपूर्ण देशात भारतीय न्याय संहिता -२०२३ या सुधारित नविन कायद्याची अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे. ब्रिटिशकालीन भारतीय दंड विधान संहिता आता इतिहास जमा झाले आहे.
१६ पोलीस ठाण्यात नवीन कायद्याच्या अंमलबाजवणीला सुरूवात
भारतीय न्याय संहिता - २०२३ या सुधारित नविन कायद्याची अंमलबजावणी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, देवरी, चिचगड, डुग्गीपार, अर्जुनी-मोरगाव, नवेगावबांध, केशोरी, गोरेगाव, तिरोडा, दवनीवाडा, गंगाझरी, रावणवाडी, रामनगर, गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण या संपुर्ण १६ ठाण्यात नविन कार्य प्रणालीचे सॉफ्टवेअर अद्यावत करून नवीन प्रणाली द्वारे गुन्हे नोंदविण्याची प्रक्रियेला सुरूवात झाली असल्याचे पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी लोकमतला सांगितले.
दारूड्यावर अदखलपात्र गुन्हा
भारतीय न्याय संहिता -२०२३ ची अंमलबजावणी गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणे दवनिवाडा येथे नवीन सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे करण्यात आली. भारतीय न्याय संहिता -२०२३ चे कलम ११५ (२), ३५२ प्रमाणे दारू पिण्यावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिविगाळ करणाऱ्यावर नवीन कायद्यातील पहिल्याच अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.