गोंदिया वनविभागात ८० टक्के रोपटी जिवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:52 AM2017-07-22T00:52:39+5:302017-07-22T00:52:39+5:30
राज्य शासनाच्या वृक्षारोपण अभियानांतर्गत केलेल्या रोपट्यांचे योग्य संवर्धन न केल्याने कोट्यवधी रूपये व्यर्थ जात असल्याची ओरड होत आहे;
वृक्षारोपणाने गिधाडीचे बदलतेय रुप : ओसाड परिसरात पसरत आहे हिरवळ
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य शासनाच्या वृक्षारोपण अभियानांतर्गत केलेल्या रोपट्यांचे योग्य संवर्धन न केल्याने कोट्यवधी रूपये व्यर्थ जात असल्याची ओरड होत आहे; मात्र गोंदिया जिल्हा याला अपवाद ठरला असून रोपण केलेली ८० टक्के रोपटे जिवंत असल्याने या परिसराचे रुप बदलत असल्याचे चित्र
आहे.
पर्यावरणाच्या संवर्धन व संतुलनाच्या दृष्टीने सन २०१६ मध्ये १ जुलैला राज्य शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला. यातंर्गत जिल्ह्यात ९ लाख ६३ हजार ६०० रोपट्यांची लागवड केली होती. यापैकी आठ लाख ९६ हजार ३८३ रोपटे जिवंत असल्याची हमी जिल्हा प्रशासनाने दिली होती. वन विभागाद्वारे ७४ ठिकाणांवर सात लाख ४८ हजार रोपट्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. यापैकी सात लाख २५ हजार ९३८ (९७ टक्के) रोपटे जिवंत असल्याचा दावा प्रशासनाद्वारे करण्यात आला होता. पण, लागवड केलेल्या रोपट्यांपैकी ८० टक्के रोपटे शिल्लक होते. परंतु मृत रोपट्यांच्या जागी नवीन रोपटे लावण्यात आले आहेत. यावर्षी चार कोटी वृक्षारोपण अभियानांतर्गत वन विभागाद्वारे आठ लाख ४६ हजार ८५९ रोपटे लावण्यात आले.
गोरेगाव वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव यांच्यानुसार, विभागाजवळ सद्यस्थितीत सात लाख रोपटे तयार आहेत. गोरेगाव वन विभागाच्या नर्सरीमध्ये ३५ हजार रोपटे उपलब्ध आहेत. गिधाडी वन परिक्षेत्रात दोन कोटी वृक्षारोपण अभियानांतर्गत ३३ हजार ९०० रोपटे लावण्यात आले होते. २० टक्के मृत रोपट्यांच्या जागेवर नवीन रोपटे लावण्यात आले आल्याचे सांगण्यात आले आहे.
वनात सोनी-चिल्हाटी या सात-आठ गावांतील महिला बचत गटांच्या माध्यमातून सागवान, आवळा, बेल, हिरडा, बेहडा, जांभूळ आदींचे रोपटे लावण्यात आले. त्यांचे संगोपणही केले जात आहे.