केंद्र पुरस्कृत आवास योजनेत गोंदिया प्रथम ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:32 AM2021-08-27T04:32:07+5:302021-08-27T04:32:07+5:30
गोंदिया : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरीसाठी दिल्या जाणारा महाआवास अभियानात गोंदिया जिल्ह्याला ...
गोंदिया : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरीसाठी दिल्या जाणारा महाआवास अभियानात गोंदिया जिल्ह्याला प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. ही जिल्हावासीयांसाठी गौरवाची बाब आहे. विभागीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीबद्दलचा गौरव सोमवारी (दि. ३०) विभागीय आयुक्तांच्या सभागृहात करण्यात येणार आहे.
महाआवास अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हे, तालुके, तसेच उत्कृष्ट ग्रामपंचायतींना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत विभागीय स्तरामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा प्रथम पुरस्कार गोंदिया जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. द्वितीय पुरस्कार भंडारा जिल्हा तर तृतीय पुरस्कारासाठी वर्धा जिल्ह्याची निवड झाली आहे. उत्कृष्ट तालुक्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय तालुका म्हणून गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, गोंदिया व तिरोडा पंचायत समितीला अनुक्रमे पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यासोबतच उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून गोंदिया जिल्ह्यातील तळेगाव, द्वितीय कोरंबी तसेच केशोरी या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांची निवड झाली आहे. उत्कृष्ट तालुक्यामध्ये प्रथम सडक अर्जुनी (गोंदिया), द्वितीय लाखांदूर, तृतीय पवनी पंचायत समिती जिल्हा भंडारा यांची निवड झाली आहे.