दुसऱ्या दिवशीही विदर्भात गोंदियाच ‘कूल’
By कपिल केकत | Published: January 29, 2024 07:50 PM2024-01-29T19:50:35+5:302024-01-29T19:50:56+5:30
- किमान पारा ११.६ अंशांवर : जिल्ह्यात थंडीचा मुक्काम कायम
गोंदिया: विदर्भासह जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी उबदार वातावरण जाणवत असताना आता पुन्हा थंडीने जोर धरला आहे. रविवारी (दि. २८) जिल्ह्याचे किमान तापमान १०.२ अंशांवर आले होते. जिल्हा विदर्भात प्रथम क्रमांकावर होता, तर सोमवारी (दि. २९) पारा चढून ११.६ अंशांवर गेला. मात्र तिसऱ्या दिवशीही गोंदिया जिल्हाच विदर्भात ‘कूल’ होता.
गत आठवडाभर ढगाळ वातावरणामुळे दमट वातावरणाची अनुभूती होती. त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली व थंडी परत परतून आली. परिणामी गारठा वाढला असून, जिल्हावासीयांना परत हुडहुडी भरली आहे. रविवारी (दि. २८) जिल्ह्याचे कमाल तापमान २०.२ अंश तर किमान तापमान १०.२ अंशांवर आले होते. विदर्भात सर्वांत कमी तापमानाची नोंद घेण्यात आलेल्यात गोंदिया जिल्हा पहिल्या क्रमांकावर होता. तर सोमवारी (दि. २९) किमान तापमान चढून ११.६ अंशांवर गेले होते. मात्र विदर्भात गोंदियाचेच तापमान सर्वात कमी होते व जिल्हा पहिल्याच क्रमांकावर कायम होता. थंडीचा जोर वाढल्याने विशेषतः लहान बालके व वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. तर शहरासह ग्रामीण भागातील नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेताना निदर्शनास येत आहेत. कपाटात ठेवलेल्या उबदार कपड्यांचा वापर वाढला असून, काळजी घेतली जात आहे.
रात्री लवकरच शुकशुकाट
- काही दिवसांपूर्वी उकाडा वाढून पंख्याची गरज भासू लागली होती. यानंतर उन्हाळा आतापासूनच तापवणार की काय, अशी भीती वाटू लागली होती. मात्र, वातावरणाने परत एकदा करवट बदलली असून, अवकाळी पावसानंतर थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. यामुळे आता रात्री लवकरच रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. विशेष म्हणजे, वातावरणातील या बदलामुळे सर्दी व खोकला परत एकदा जोर करू लागला आहे.
प्रथम पाच शहरांतील तापमान
गोंदिया - ११.६
चंद्रपूर - १२.०
नागपूर - १२.८
ब्रह्मपुरी - १३.०
वर्धा - १३.६