विदर्भात गोंदियाच सर्वात 'थंड'; थंडीचा जोर वाढू लागला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 03:29 PM2024-11-20T15:29:50+5:302024-11-20T15:31:21+5:30
Gondia : किमान तापमान १३.२ अंशांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण जरी तापलेले आहे. मात्र वातावरणात पारा घसरला असून थंडीचा जोर वाढू लागला आहे. मंगळवारी (दि. १९) जिल्ह्याचे कमाल तापमान २९.२ तर किमान तापमान १३.२ अंशांवर आले होते. विदर्भातगोंदियाच सर्वांत 'कूल' ठरला.
यंदा दिवाळी आटोपूनसुद्धा थंडी जाणवत नव्हती. यामुळे यंदा वातावरणाचा अंदाज समजून येत नव्हता व त्यामुळे आतापर्यंत गरम कापडांची गरज भासली नाही. मात्र मागील चार-पाच दिवसांपासून थंडीने एन्ट्री मारली असून आता हिवाळ्याला सुरुवात झाल्याचा अनुभव येऊ लागला आहे.
अशातच मंगळवारी (दि. १९) जिल्ह्याचे कमाल तापमान २९.२ अंशावर तर किमान तापमान १३.२ अंशांवर आले होते. विशेष म्हणजे, विदर्भात गोंदियाचेच तापमान सर्वात कमी असून गोंदियाच 'कूल' ठरला आहे. आता थंडीचा जोर वाढू लागल्याने नागरिकांना सकाळी व रात्री गरम कापडांचा आधार घ्यावा लागत आहे. तर ग्रामीण भागात थंडीचा जोर जास्त राहत आहे. यामुळे लवकरच शुकशुकाट होताना दिसत आहे. गुलाबी थंडी सुरू झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळाली आहे. दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत असून जिल्हावासी आनंद घेत आहे.
शेकोटीवर सुरू आहेत निवडणुकीच्या चर्चा
ग्रामीण भागात थंडीचा जोर जास्त राहत असल्याने काही भागात शेकोटी पेटू लागली आहे. विशेष म्हणजे, ही शेकोटी अंगासह राजकीय वातावरणही तापवू लागली आहे. शेकोटीच्या अवती- भवती नागरिक बसून आग तापत निवडणुकीचे वेगवेगळे समीकरण व चर्चा करण्यात रंगलेले दिसून येत आहेत.
विदर्भातील प्रमुख पाच ठिकाणचे किमान तापमान
गोंदिया - १३.२
नागपूर - १३.५
ब्रह्मपुरी- १४.२
गडचिरोली- १४.४
अमरावती-चंद्रपूर- १४.६