गोंदिया - मध्यप्रदेश बस सेवा तत्काळ सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:28 AM2021-09-03T04:28:58+5:302021-09-03T04:28:58+5:30
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून, जिल्हा कोरोनामुक्तिच्या वाटेवर आहे. त्यामुळे रस्त्यावर खासगी व सार्वजनिक वाहनांना वाहतुकीस परवानगी ...
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून, जिल्हा कोरोनामुक्तिच्या वाटेवर आहे. त्यामुळे रस्त्यावर खासगी व सार्वजनिक वाहनांना वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अद्याप एसटी बस व खासगी बसेस यांना मध्यप्रदेशात प्रवेश करण्यास बंदी आहे. त्यामुळे गोंदिया ते मध्यप्रदेश बस सेवा त्वरित सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या बसेस व इतर वाहनांना बंदी लावण्यात आली होती. मात्र, राज्यासह जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असून, जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहे. परंतु, मध्यप्रदेश शासनाने राज्यातील बससेवेला अद्याप राज्यात प्रवेशावर बंदी लावली आहे. गोंदिया आगारातून मध्यप्रदेशच्या बालाघाट, रजेगाव, मलाजखंडकडे जाणारी बससेवा बंदच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. परिणामी, नागरिकांना खासगी ऑटोरिक्षा व खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. अनेक वाहनचालक नागरिकांकडून मनमर्जीतून प्रवास भत्ता वसूल केला जातो. तसेच रात्रीच्या वेळेत प्रवाशांना लुटण्याचा प्रकार निजी वाहनधारकांकडून सुरू आहे. या सर्व प्रकारावर आळा घालण्याकरिता बससेवा सुरू करावी. याकरिता गोंदिया ते मध्यप्रदेश बससेवा त्वरित सुरू करण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना सामाजिक कार्यकर्ते सूरज नशिने, दिव्या भगत-पारधी, हरिश अग्रवाल यांनी दिले.