गोंदिया भाजपात बंडाचे निशाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 06:00 AM2019-10-02T06:00:00+5:302019-10-02T06:00:14+5:30
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सभा मंगळवारी शहरातील एका लॉन मध्ये पार पडली. सभेला माजी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल,न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा,घनश्याम पातावणे,बंडू जोशी उपस्थित होते. काँग्रेसचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला.भाजपकडून त्यांना गोंदिया विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रात भाजपची फळी उभारण्याचे काम ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केले. कार्यकर्ते सदैव पक्षाच्या पाठीशी उभे राहिले. पक्षाच्या सर्वच ध्येय धोरणांचा आदर करीत एकनिष्ठेने काम केले. मात्र पक्ष ऐनवेळी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला डावलून दुसºया पक्षातून आलेल्यांना मानाचे पान देऊन उमेदवारी देत आहे. त्यामुळे हा केवळ कुणा एका व्यक्तीच्या नव्हे तर समस्त निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भावनाना ठेच पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचा भावाना भाजप कार्यकर्त्यांनी येथे आयोजित सभेत व्यक्त केल्या.
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सभा मंगळवारी शहरातील एका लॉन मध्ये पार पडली. सभेला माजी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल,न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा,घनश्याम पातावणे,बंडू जोशी उपस्थित होते. काँग्रेसचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला.भाजपकडून त्यांना गोंदिया विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली जाणार आहे. यामुळे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी मंगळवारी एकत्र पक्षाच्या निर्णयाचा विरोध केला.मागील १० वर्षांपासून विनोद अग्रवाल हे या क्षेत्रात कार्यरत आहे. ते पक्षाचे काम निष्ठेने करीत असतांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.या वेळी गोंदिया ग्रामीण मधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षाने उमेदवार जाहीर केला आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा उमेदवार हे विनोद अग्रवाल असून त्यांनी निवडणुकीत माघार घेऊन नये असा आग्रह धरला.या निवडणुकीत त्यांचे राजकीय अस्तीत्त्व नव्हे तर भाजपमधील निष्ठावान कार्यकर्त्यांचे अस्तीत्व पणाला लागले असल्याच्या भावना व्यक्त केला. त्यामुळे विनोद अग्रवाल यांनी कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर करीत ३ आॅक्टोबरला अपक्ष उमेदवार म्हणून गोंदिया विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान भाजप काही पदाधिकारी मंचावर नसले तरी या सभागृहाच्या परिसरात वावरताना दिसले. त्यामुळे गोंदिया विधानसभा क्षेत्रात भाजपमधून बंडखोरी होण्याची शक्यता बळावली आहे.
पदाधिकारी सभेपासून दूर
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील भाजप कार्यकर्त्यांची सभा मंगळवारी जलाराम लॉन येथे आयोजित करण्यात आली होती.या सभेला भाजप जिल्हाध्यक्ष किंवा एकही वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित नव्हता.त्यामुळे पदाधिकारी या सभेपासून दूर असल्याचे चित्र होते.त्यामुळे या पदाधिकाऱ्यांच्या मनात नेमके काय आहे मात्र निवडणुकी दरम्यान दिसून येईल.
भाजपकडे सक्षम उमेदवार नाही का?
गोंदिया विधानसभा क्षेत्रातून भाजपतर्फे निवडणूक लढविण्यासाठी एकूण १९ इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींनी यासर्व इच्छुकांना डावलून काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपकडे सक्षम, निष्ठावान उमेदवार नाही का?असा सवाल देखील उपस्थित कार्यकर्त्यांनी केला.
भाजपमध्ये धूसफूस
गोपालदास अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले नाही. तर अनेकांमध्ये अस्वस्थता दिसून येत होती. सर्वच पदाधिकारी आम्ही पक्षाच्या ध्येय, धोरणाचे पालन करु असे सांगत अधिक बोलत नसल्याने त्यांच्यामध्ये धूसफूस कायम असल्याचे चित्र आहे.
पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील उमेदवारीवरुन कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तर जिल्ह्यातील पदाधिकारी सुध्दा अस्वस्थ आहेत. त्यामुळे या असंतोषाचा फटका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पक्ष यावर नेमके कुठले औषध शोधते याकडे लक्ष लागले आहे.