आमदारांनी वीज अभियंत्याच्या कानशिलात लगावली; कार्यालयात तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2022 10:24 AM2022-08-30T10:24:04+5:302022-08-30T10:51:52+5:30
गाेंदियातील प्रकार, वीज अभियंता रामनगर पोलीस ठाण्यावर धडकले
गोंदिया : मुर्री येथील एका ग्राहकाची वीजजोडणी कापली. त्यामुळे संतापलेले आमदार विनोद अग्रवाल यांनी महावितरणच्या ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश तमगाले यांच्या कानशिलात लगावली. सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सूर्याटोला उपविभाग कार्यालयात ही घटना घडली. या घटनेनंतर वीज अभियंत्यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविण्याची मागणी केली. त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.
वीज अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लगतच्या ग्राम मुर्री निवासी लारोकर यांच्यावर ११ हजार रुपयांचे वीजबिल थकित असून यासाठी वीज अभियंता शुक्रवारी त्याच्याकडे गेले होते. यावर त्याने सोमवारी बिल भरतो असे म्हणत वेळ मागितली. मात्र सोमवारी बिलाच्या रकमेतील ४००० रुपये भरतो व उर्वरित रक्कम नंतर भरणार असे म्हटले. त्यामुळे त्यांची वीजजोडणी कापण्यात आली. या प्रकरणाला घेऊन आमदार अग्रवाल महावितरणच्या सूर्याटोला येथील उपविभाग कार्यालयात गेले. तेथे उपस्थित असलेल्या उपकार्यकारी अभियंत्यांना एक-दोन नव्हे तर तब्बल पाच झापड मारल्या.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
या प्रकारामुळे संतापलेल्या वीज अभियंत्यांना लगेच रामनगर पोलीस ठाणे गाठून आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
उपअभियंत्यांना मारहाण करण्याचा प्रश्नच नाही. मी या प्रकरणात समझोता घडवून आणण्यासाठी गेलो होतो. चार हजार रुपये भरून वीज खंडित करू नये, अशी सूचना केली होती. मात्र, या प्रकरणाला वेगळी कलाटणी देऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.
विनोद अग्रवाल, आमदार