Gondia: खूनाच्या बदल्यात खून करुन अपघात भासवला, सीसीटीव्हीने भांडाफोड केला
By नरेश रहिले | Published: December 10, 2023 01:43 PM2023-12-10T13:43:14+5:302023-12-10T13:43:30+5:30
Crime News: खून का बदला खून ही म्हण आपण सिनेमात ऐकतो, परंतु ३० वर्षापूर्वी वडीलाचा खून करणाऱ्या व्यक्तीचा रहस्यमय खून केला. हा खून अपघात दाखविण्यासाठी त्याने हे कृत्य केले.
- नरेश रहिले
गोंदिया - खून का बदला खून ही म्हण आपण सिनेमात ऐकतो, परंतु ३० वर्षापूर्वी वडीलाचा खून करणाऱ्या व्यक्तीचा रहस्यमय खून केला. हा खून अपघात दाखविण्यासाठी त्याने हे कृत्य केले. परंतु मृताची स्थिती, परस्थितीजन्य आणि घटनास्थळावरील भौतिक पुरावे तसेच शेजारील सी. सी. टी. व्ही. फुटेजची पाहणी केल्यावर फुलचूरटोला ते पिंडेकपार या रस्त्यावर झालेला अपघात हा अपघात नसून खून असल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. सुनील भोंगाडे व शाहरुख शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे.
गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ ते ६:३० वाजता दरम्यान फुलचुरटोला ते पिंडकेपार जाणाऱ्या रोडवर मोटार सायकलचा अपघात झाल्याने मोरेश्वर खोब्रागडे रा. चंद्रशेखर वॉर्ड, श्रीनगर, गोंदिया यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी गुन्ह्यात खून प्रकरणात कलमवाढ करण्याचे निर्देश दिले होते. यावरून गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम ३०२, ३४१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खून प्रकरणाचा छडा लावून सत्यता पडताळून गुन्ह्याचा उलगडा केला. आरोपी सुनील भोंगाडे याच्या वडीलाचा खून ३० वर्षापूर्वी मृतकाने केला होता. त्यासाठी सुनिल आठ दिवसापासून मृतकच्या मागावर होता. १०० ते १५० च्यावर सी. सी.टी.व्ही. फुटेजची पडताळणी आणि तांत्रीक विश्लेषणाची खात्री करून आरोपी सुनील धनिराम भोंगाडे (४४) रा. शास्त्री वॉर्ड गोंदिया व त्याच्या दुकानात काम करणारा साथीदार आरोपी शाहरूख हमीद शेख (२४) रा. कुऱ्हाडी यांना अटक करण्यात आली आहे.
जमीनीच्या वादातून ३० वर्षापूर्वी मृतकच्या वडीलाचा केला होता खून
मृतक मोरेश्वर खोब्रागडे याने आपल्या भावासोबत मिळून जमीनीच्या वादातून सुनिल भोंगाडे यांच्या वडीलाचा मनोहर चौक गोंदिया येथे धारदार शस्त्राने वार करुन ठार केले होते, असे सुनिल भोंगाडे याने पोलिसांना दिलेल्या माहिती सांगितली आहे. मृतक एकावर्षापासून कोणत्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये सुनील भोंगाडे याुा पाहुन नेहमी हिनविण्याचे उद्देशाने हसत होता. याचाही राग सुनिलला होता.
रस्त्यावर अडविले लोखंडी राडने मारून केला खून
आरोपी सुनील धनिराम भोंगाडे व शाहरूख हमीद शेख या दोघांनी २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गाडीने पिंडकेपार रोडकडे जावून अनिल कबाडी याच्या गोदामालगत असलेल्या खुल्या जागेत मृतक मोरेश्वर खोब्रागडे याला रोडवर गाडीने अडवून लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर पाच ते सहा वार केले. शाहरुख याने त्यास लाथाबुक्याने डोक्यावर व पोटावर मारहाण करून पसार झाल्याची माहिती पोलिसांना दिली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शानात पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, वनिता सायकर, सहाय्यक फौजदार अर्जुन कावळे, पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, महेश मेहर, इंद्रजीत बिसेन,सोमेंद्रसिंग तुरकर, रियाज शेख तुलसिदास लुटे, नेवालाल भेलावे, चित्तरंजन कोडापे, सुजित हलमारे, संतोष केदार, अजय रहांगडाले, चालक लक्ष्मण बंजार, घनश्याम कुंभलवार, विनोद गौतम, नक्षल सेल येथील आशिष वंजारी, सायबर सेलचे दीक्षित दमाहे, धनंजय शेंडे, संजय मारवाडे, सोनवणे, रहीले, येरणे, शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, गोंदिया ग्रामीणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे, नक्षल सेलचे पोलीस निरीक्षक भुषण बुराडे यां यांनी केली आहे.
तपासासाठी तयार केली होती सहा पथके
गुन्ह्याचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळी तीन पथके तयार करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण, नक्षल सेल येथील अधिकारी अंमलदार यांची वेगवेगळी पथके आरोपीचा शोध व सदर प्रकरणाचा उलगडा करण्याकरिता नेमण्यात आली होती.