आर्थिक व्यवहारातूनच प्राॅपर्टी डीलरचा खून, चारच तासांत आरोपी जेरबंद
By नरेश रहिले | Published: June 10, 2024 07:37 PM2024-06-10T19:37:41+5:302024-06-10T19:38:57+5:30
जखमीचा उपचार घेताना रात्रीच मृत्यू; चार तासांत चौघांना अटक
गोंदिया : जमिनीच्या आर्थिक देवाण-घेवाणीतूनच प्रापर्टी खरेदी-विक्रीचे काम करणाऱ्या तरुणावर हल्लेखाेरांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना शहरातील छोटा गोंदिया परिसरातील किसान चौक येथे रविवारी (दि. ९) सकाळी ९:४५ वाजता घडली. महेश विजयकुुमार दखने (३६, रा. छोटा गोंदिया) या प्रापर्टी डीलरचा उपचार घेताना येथील खासगी रुग्णालयात ९ जून रोजी रात्री ९:३० वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
शहरातील पतंगा चौक ते तिरोडा बायपास रोड परिसरातील किसान चौक येथील जान्हवी ऑटो रिपेअरिंग सेंटर येथे रविवारी (दि.९) सकाळी ९:४५ वाजताच्या दरम्यान महेश विजयकुुमार दखने (३६) हे दुचाकी वाहन क्रमांक एमएच-३५-एव्ही ९५५० ने गेले होते. यावेळी हल्लेखोरांनी त्याला घेरले व त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला हतोडा, कुऱ्हाडी व तलवार या शस्त्रांनी वार करून जखमी केले. यात रक्तस्राव झाल्याने महेश जमिनीवर पडला व ओरडण्याचा आवाज केल्याने हल्लेखोर पळून गेले होते. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत सूर्यवंशी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांनी वेगवेगळे पथक तयार केले. आरोपीतांचा त्वरित शोध सुरू केला. अनेक संशयित आरोपींचा तपास केल्यानंतर व घटनास्थळावरून प्राप्त झालेली माहिती, मिळालेली गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या चार तासांत आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम, सहायक पोलिस निरीक्षक संजय पांढरे, पोलिस उपनिरीक्षक मंगेश वानखडे, शरद सैंदाने, चन्नावार, पोलिस उपनिरीक्षक घनश्याम थेर, पोलिस हवालदार जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, कवलपालसिंह भाटिया, निशिकांत लोंदासे यांनी केली आहे.
या आरोपींना केली अटक
महेश दखने यांचा खून करणाऱ्या आरोपीत देवेंद्र ऊर्फ देवा तुकाराम कापसे (४८) रा. शिवमंदिर, आंबाटोली, फुलचूर गोंदिया, सुरेंद्र हरिदास मटाले (३२) रा. शिवणी/ इंदिरानगर, चिरचाळबांध, ता. आमगाव, मोरेश्वर चैतराम मटाले (२६) रा. मोहगाव, (सुपलीपार) ता. आमगाव व नरेश नारायण तरोणे (३८) रा. आर.टी.ओ. ऑफिसजवळ, गोंदिया यांना अटक करण्यात आली. या आरोपींना १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश वानखडे करीत आहे.
मृतकावर एक गुन्हा तर आरोपीवर सात गुन्हे
मृतक महेश विजयकुमार दखने याच्यावर फसवणूक केल्याचा एक गुन्हा दाखल आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी देवेंद्र ऊर्फ देवा तुकाराम कापसे याच्यावर गंभीर दुखापत केल्याचा एक गुन्हा दाखल आहे. तर याच प्रकरणातील चौथा आरोपी नरेश नारायण तरोणे याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न असे या पूर्वीचे सात गुन्हे दाखल आहेत.
कलमात केली वाढ
महेश विजयकुमार दखने (३६) यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चौघांवर कामिनी महेश दखने (३४) रा. छोटा गोंदिया यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३०७, ३४ अन्वये ९ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. महेश दखने याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तपासात भादंविच्या कलम ३०२ वाढ करण्यात आली आहे.