गोंदिया : उरले फक्त २३ दिवस, बूस्टर डोस घेणारे लाखही नाहीत
By कपिल केकत | Published: September 6, 2022 08:37 PM2022-09-06T20:37:23+5:302022-09-06T20:42:22+5:30
सुमारे ५.८८ लाख नागरिकांचे टार्गेट
(कपिल केकत - गोंदिया )
गोंदिया : कोरोनापासून सुरक्षा मिळावी यासाठी केंद्र शासनाने देशवासीयांना नि:शुल्क बूस्टर डोस देण्यासाठीचा निर्णय घेतला. १५ जुलै पासून सुरू असलेले हे लसीकरण सत्र येत्या ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे. मात्र असे असतानाही जिल्ह्यात लाखाच्या घरात ही नागरिकांनी बूस्टर डोस घेतला नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. आता या सत्राचे २३ दिवस उरले असून, या कालावधीत सुमारे ५,८८,६०२ लाख नागरिकांना डोस द्यावयाचे आहे.
कोरोनाच्या दोन लाटांनी केलेली हानी कधीही न भरून निघणारी आहे. यामुळेच कोरोनाची लस हाती आल्यापासूनच शासनाकडून लसीकरणासाठी आग्रह केला जात आहे. त्याचे फळही तिसरी लाट कमकुवत झाल्यावरून मिळून आले आहेत. तर आता चौथी लाट सुरू झाली असून या लाटेतही कुठलाही धोका पत्करण्यासाठी शासन तयार नसून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बघता सर्वांसाठी मोफत बूस्टर डोस देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यांतर्गत १५ जुलैपासून यासाठी विशेष लसीकरण सत्र सुरू झाले आहे.
मात्र जिल्ह्याची शोकांतिका अशी की,सुरुवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात ९८,८३४ नागरिकांनीच बूस्टर डोस घेतला आहे. म्हणजेच, लाखाच्या घरात ही बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या पोहोचलेली नाही. तर १५ जुलैपासून आतापर्यंत ७८,४८७ नागरिकांनीच बूस्टर डोस घेतला आहे. ३० सप्टेंबर रोजी ७५ दिवसांचे हे विशेष सत्र संपणार असून या २३ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील सुमारे ५, ८८,६०२ नागरिकांना बूस्टर डोस देण्याचे आरोग्य विभागाचे टार्गेट आहे.
आमगाव तालुक्याची सर्वोत्तम कामगिरी
बूस्टर डोसची तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास आमगाव तालुक्याने सर्वोत्तम कामगिरी केल्याचे दिसते. येथे ७०,७७३ नागरिकांच्या डोसचे टार्गेट असतानाच १०,८८१ नागरिकांना डोस देण्यात आला असून त्याची १५.३७ एवढी टक्केवारी आहे. तर सर्वात कमी फक्त ७.३७ टक्के लसीकरण अर्जुनी-मोरगाव तालुक्यात झाल्याचे दिसते. येथे ९९२४१ नागरिकांना बूस्टर डोस द्यावयाचा असतानाच फक्त ७३१६ नागरिकांचा डोस देण्यात आला आहे.
लसीकरणाशिवाय पर्याय नाही
कोरोनाच्या सुरुवातीच्या दोन लाटांमधील ते दिवस आठवण केल्यास आजही अंगावर काटा येतो. कित्येकांचे घर संपवून टाकणाऱ्या त्या काळात कोरोनावर औषधीची मागणी केली जात होती. आता कोरोनाला मात देण्यासाठी लस हाती आली असून त्याचे प्रभावही दिसून येत आहेत. मात्र आता नागरिक लस घेण्यासाठी दुर्लक्ष करीत आहेत. कित्येकांनी आतापर्यंत एकही डोस घेतलेला नाही. तर कित्येकांना दुसरा डोस घेतलेला नाही. आता बूस्टर डोसलाही नागरिक टोलवत आहेत. मात्र लसीकरणाशिवाय पर्याय नाही हेच सत्य आहे.
बूस्टर डोसचा तालुकानिहाय तक्ता
तालुका- टार्गेट - लसीकरण- टक्केवारी
गोंदिया- १,९५,५३६- २३१४९- ११.७८
आमगाव- ७०७७३- १०८८१- १५.३७
तिरोडा- ८१९२६- ८१३६-९.९३
गोरेगाव- ६४८६२-८५८५- १३.२४
सालेकसा- ४७६०८- ६२१९- १३.०६
देवरी- ६३२५९- ५४०९- ८.५५
सडक-अर्जुनी- ६३२३१- ८७९२- १३.९०
अर्जुनी-मोरगाव- ९९२४१- ७३१६- ७.३७