Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यातील पहिला कोरानाबाधित रुग्ण झाला बरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 09:03 PM2020-04-10T21:03:31+5:302020-04-10T21:04:47+5:30
जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण गोंदिया येथे आढळला होता. दरम्यान १७ दिवसानंतर शुक्रवारी (दि.१०) त्याचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्याने रात्री ८.३० वाजताच्या सुमारास त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण गोंदिया येथे आढळला होता. यानंतर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात यामुळे खळबळ उडाली होती. सदर रुग्णावर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन कक्षात उपचार सुरू होते. दरम्यान १७ दिवसानंतर शुक्रवारी (दि.१०) त्याचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्याने रात्री ८.३० वाजताच्या सुमारास त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
गोंदिया जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण २६ मार्च रोजी गोंदिया येथे आढळला होता. सदर रुग्ण हा बँकांक येथून गोंदिया येथे परतल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे त्याच्या वैद्यकीय तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली होती. आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीय व मित्रांना सुध्दा येथील कुडवा परिसरातील विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्या सर्वांचे रिपोर्ट या आधीच कोरोना निगेटीव्ह आले होते. सदर रुग्णावर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन कक्षात उपचार सुरू होता. सदर रुग्ण रुग्णालयात दाखल केल्या पहिल्याच दिवसापासून उपचाराला प्रतिसाद देत होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सदर रुग्णांचे उपचारादरम्यान दोनदा स्वॅब नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शुक्रवारी (दि.१०) त्याचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या वेळी सदर रुग्णाचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. रुग्णालयातील सर्व डॉक्टर, आरोग्य सेविका आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून आणि पुष्पगुच्छ देऊन त्याला सदृढ आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.रुग्णालयातून सुटी दिल्यानंतर सदर रुग्णाला १४ दिवस घरीच होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
जिल्हा झाला कोरोनामुक्त
जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण गोंदिया येथे आढळल्यानंतर संपूर्ण जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सदर रुग्ण आता पूर्णपणे बरा झाल्याने शुक्रवारी रात्री त्याला रूग्णालयातून सुटी देण्यात आली. देण्यात आली. त्यामुळे आता जिल्हा कोरोना मुक्त झाला असून जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णावर मागील १७ दिवसांपासून उपचार सुरू होते. त्याने पहिल्याच दिवसापासून उपचाराला प्रतिसाद दिला. उपचारा दरम्यान तीनदा त्याचे स्वॅब नमुने तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. शुक्रवारी त्याचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
- व्ही.पी.रुखमोडे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.