गोंदियातील प्रदूषण नियंत्रणाबाहेर!
By admin | Published: November 22, 2015 01:55 AM2015-11-22T01:55:52+5:302015-11-22T01:55:52+5:30
राज्यातील सर्वात जास्त २६० राईस मील गोंदिया जिल्ह्यात आहेत. त्यामुळे येथे जलप्रदूषणासोबत वायू प्रदूषणाचे प्रमाण मोठे आहे.
२६० राईस मिल : तपासणीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळच अनभिज्ञ
गोंदिया : राज्यातील सर्वात जास्त २६० राईस मील गोंदिया जिल्ह्यात आहेत. त्यामुळे येथे जलप्रदूषणासोबत वायू प्रदूषणाचे प्रमाण मोठे आहे. मात्र दूषित गोंदियाचे प्रदूषण किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीच त्याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. गोंदियाच्या प्रदूषणाची कधी तपासणी केली हे उपप्रादेशिक प्रदूषण अधिकाऱ्यांनाही माहित नाही. विशेष म्हणजे शहरातील वायूप्रदुषणाची पातळी किती आहे हे मोजणारे यंत्रसुद्धा गोंदियात बसविण्याची गरज या विभागाला इतक्या वर्षात वाटली नाही.
रेड मार्क असलेल्या (अतिसंवेदनशिल) उद्योगांची महिन्यातून दोन वेळा तपासणी करून त्या संदर्भातील अहवाल संबंधित कंपनीला दिला जातो. गोंदियात अदानी व टीम फेरो या दोन उद्योग कंपन्यांची तपासणी दर महिन्याला केली जाते. परंतु गोंदिया जिल्ह्यात २६० राईस मील असून त्यांची दोन वर्षांपासून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणीच झाली नाही. राईस मिलमधून फक्त धान पिसवून तांदूळ बनविणाऱ्या २०० तर उष्णा तांदूळ तयार करणाऱ्या ६० राईस मील आहेत.
तांदूळ तयार करणाऱ्या या राईस मिलला प्रदूषण मंडळ प्लेन मिल तर उष्णा तांदूळ काढणाऱ्या मिलना पॅरामीट राईस मिल म्हणून संबोधतात. या राईस मिलमुळे जलप्रदूषण, वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असते. या राईसमीलपासून होणाऱ्या प्रदूषणाची पातळी मोजणारे यंत्र गोंदिया शहरात नाही. गोंदिया जिल्हा निर्मीती होऊन १५ वर्षांचा कालावभी लोटला, मात्र गोंदियात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे साधे कार्यालयसुद्धा नाही. प्रदूषणाची पातळी मोजणारे केंद्रही नाही.
दिवसेंदिवस गोंदियात वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होणे साहजिकच आहे. परंतु राईस मिल मधून निघणारा प्राणघातक वायू दिवसेंदिवस वाढत आहे. याची तपासणी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी येतही नाही. केवळ औपचारिकता म्हणून सादर करायचे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र कार्यालयात बसूनच बनविले जाते की काय, असा प्रश्न या परिस्थितीवरून पडल्याशिवाय राहात नाही. (तालुका प्रतिनिधी)
दोन जिल्ह्यांचा कारभार सांभाळतो एक व्यक्ती
भंडाऱ्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयात चार पदे मंजूर आहेत. त्यापैकी फिल्ड आॅफिसरची तीन पदे रिक्त आहेत. फक्त एक उपप्रादेशिक प्रदूषण अधिकारी कार्यरत आहेत. भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्यांचा कारभार पाहणाऱ्या या कार्यालयात कोणीही फिल्ड आॅफिसर नसताना केवळ एक अधिकारी कसा कारभार करीत असेल यावरून येथील कारभाराची कल्पना येते. यामुळेच गोंदियातील प्रदूषणाची पातळी किती आहे? असे विचारले असता सदर अधिकाऱ्याने त्याबाबत अनभिज्ञता दर्शविली.
राईस मिल मालक व अधिकाऱ्यांचे साटेलोटे?
ज्या ठिकाणी वायूप्रदुषण निर्माण करणारे कारखाने, उद्योग आहेत त्या कोणत्याही शहरात हवा गुणवत्ता मोजणी केंद्र असणे गरजेचे ओ. मात्र गोंदियात राज्यात सर्वात जास्त राईस असताना येथे हे केंद्र अद्याप का दिले नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे असे केंद्र गोंदियात असावे यासाठी भंडाऱ्याच्या प्रदुषण नियंत्रण मंडळाने कोणताही प्रस्ताव इतक्या वर्षात शासनाकडे पाठविलेला नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांचे आणि मिल चालविणाऱ्या मालकांचे साटेलोटे असल्याशी दाट शंका निर्माण झाली आहे.
गोंदियात प्रदूषण किती आहे, हे सांगता येणार नाही. राईस मिल्सची तपासणी कधी झाली ते आता सांगता येणार नाही. प्रदूषणाची पातळी मोजण्याचे यंत्र गोंदियात असणे गरजेचे आहे, पण ते आतापर्यंत लागलेले नाही. त्याची कारणे मला माहीत नाही. मी अलिकडेच रुजू झालो आहे.
- के.पी. पुसदकर
उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी, भंडारा