गोंदिया विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर; तापमान ४३.५ अंशावर, नवतपानंतर जास्त ताप
By कपिल केकत | Published: June 3, 2023 07:54 PM2023-06-03T19:54:05+5:302023-06-03T19:54:42+5:30
२५ मे पासून सुरू झालेला नवतपा शुक्रवारी (दि.२) संपला असून यंदा नवतपाने जिल्हावासीयांना चांगलाच ताप दिला.
गोंदिया : २५ मे पासून सुरू झालेला नवतपा शुक्रवारी (दि.२) संपला असून यंदा नवतपाने जिल्हावासीयांना चांगलाच ताप दिला. मात्र नवतपा संपल्यानंतर जिल्हा अधिक तापत असल्याचे शनिवारी (दि.३) आले. कारण, शनिवारी जिल्ह्याचे तापमान ४३.५ अंशांवर पोहोचले होते व जिल्हा विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर होता. जून महिना लागला असून तापमान वाढत चालले असल्याने जिल्हावासीयांचा जीव कासावीस होत आहे. आता त्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून फक्त पावसाची वाट पाहत आहेत.
यंदा मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी पावसामुळे दोन महिने पाहिजे तसा उन्हाळा तापला नाही. एप्रिल महिन्यातील मोजकेच दिवस तापमान वाढले होते व बहुतांश महिना पावसातच गेला होता. परिणामी सूर्यदेव जिल्ह्यावर तापू शकले नाहीत. मात्र मे महिना लागताच अवकाळी पावसाने जिल्ह्यातून पाय काढला व सूर्याने आपला हिशेब बरोबर केला. अवघ्या मे महिन्यात चांगलेच ऊन तापल्याने मार्च व एप्रिल महिन्यातील कसरही निघून गेली. विशेष म्हणजे, तापमान ४१-४१ अंशांच्या घरात असले तरीही उकाड्याने नागरिकांचे जास्त हाल झाले.
त्यात नवतपानेही चांगलेच भाजून काढले असतानाच शनिवारी (दि.२) नवतपा संपूनही तापमान उलट वाढताना दिसत आहे. शनिवारी जिल्ह्याचे तापमान ४३.५ अंशावर होते. विशेष म्हणजे, सर्वाधिक तापमान अमरावतीचे ४३.६ अंशांवर असल्याने गोंदिया जिल्हा विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर होता.
२० एप्रिल रोजी होते ४३.५ अंश तापमान
- जिल्ह्याचे तापमान यंदा सातत्याने ४१-४२ अंशांतच नोंदले गेले आहे. मात्र उकाड्यामुळे जिल्हावासीयांना जास्त त्रास सहन करावा लागला आहे. अशात शनिवारी (दि.३) जिल्ह्याचे तापमान दुसऱ्यांदा ४३.५ अंशावर पोहोचले व ते सर्वाधिक असल्याचे दिसले. यापूर्वी २० एप्रिल रोजी जिल्ह्याचे तापमान ४३.५ अंशांवर गेले होते व तेव्हाही जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर होता.
हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज नाहीच
जून महिना लागला असून तीन दिवस लोटले आहेत. मात्र त्यानंतरही अद्यापपर्यंत जिल्ह्यात पावसाचे काहीच चिन्ह दिसत नाही. उलट लगतच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावत आहे. तर जिल्ह्याचे तापमान सातत्याने वाढत असून उन्हाळ्याने काही पाठ सोडलेली नाही. त्यात हवामान खात्याकडूनही पावसाचा काहीच अंदाज वर्तविण्यात आलेला नाही.
विदर्भातील प्रथम पाच क्रमांकावरील जिल्हे
जिल्हा- तापमान
- अमरावती- ४३.६
- गोंदिया- ४३.५
- वर्धा व अकोला- ४३.४
- चंद्रपूर- ४३.२
- ब्रह्मपुरी- ४२.८