गोंदिया कमाल २९.६ अंश तर किमान १३.९ अंश, दोन्ही तापमानांमध्ये घट, विदर्भात पहिल्याच क्रमांकावर
By कपिल केकत | Published: November 26, 2023 08:17 PM2023-11-26T20:17:29+5:302023-11-26T20:18:12+5:30
गोंदिया कमाल तापमान प्रथम तर किमान तापमान बघता दुसऱ्या क्रमांकावर होता.
गोंदिया : हवामान खात्याने तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढणार, असा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार, तापमानात घट दिसून येत असतानाच गोंदियात मात्र कमाल व किमान दोन्ही तापमानांत घट झाली आहे. रविवारी (दि.२६) जिल्ह्याचे कमाल तापमान २९.६ अंश, तर किमान तापमान थेट १३.९ अंशावर आले होते. यानंतर गोंदिया कमाल तापमान प्रथम तर किमान तापमान बघता दुसऱ्या क्रमांकावर होता.
नवरात्रीपासूनच जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. गार वारे वाहू लागल्याने हिवाळ्याची चाहूल लागली होती व गुलाबी थंडीचा आनंद जिल्हावासी घेत होते. त्यात दिवाळीनंतर मात्र खऱ्या अर्थाने हिवाळ्याने एंट्री मारली असून, थंडीचा जोर हळूहळू वाढताना दिसत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंशपर्यंत व किमान तापमान १४ अंशपर्यंत येत होते. त्यानंतर हवामान खात्याने थंडीचा जोर वाढणार, असा अंदाज वर्तविला होता. त्याचे परिणाम रविवारी दिसून आले असून, गोंदिया जिल्ह्याच्या कमाल व किमान तापमानात घट झाली आहे. कमाल तापमान सर्वात कमी २९.६ अंशांवर आले असून किमान तापमान १३.९ अंशांवर आले आहे. येथे गोंदिया दुसऱ्या क्रमांकावर असून यवतमाळचे किमान तापमान १३ अंशांवर आहे.
ढगाळ वातावरणाने थंडी कमी
- मध्यंतरी सायंकाळ होताच थंडीचा जोर वाढत होता. मात्र हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला असून, त्यानुसार दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे थंडीचा जोर कमी झाल्याचे जाणवत आहे. अशात पाऊस बरसल्यास मात्र थंडीचा जोर वाढणार यात शंका नाही.
सोमवार व मंगळवारी यलो अलर्ट
- हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला असून त्यानुसार जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. विशेष म्हणजे, हवामान खात्याने सोमवारी व मंगळवारी जिल्ह्याला यलो अलर्ट दिला असून जिल्हयात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.