जिल्ह्यात अवकाळी पावसाने केला कहर; पिकांची नासाडी, घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 04:20 PM2021-12-29T16:20:17+5:302021-12-29T17:02:45+5:30

मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. काही ठिकाणी अनेक घरांचे कौल व पत्रेदेखील उडून गेले.

gondia reports 38.8mm untimely rain in 29th december, crop loss due to hailstorm | जिल्ह्यात अवकाळी पावसाने केला कहर; पिकांची नासाडी, घरांचे नुकसान

जिल्ह्यात अवकाळी पावसाने केला कहर; पिकांची नासाडी, घरांचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात बरसला सरासरी ३८.८ मिमी पाऊसग्राम मुंडीपार येथे गारपिटीसह झालेल्या पावसात अनेक घरांचे नुकसान

गोंदिया : जिल्ह्यात थंडीचा जोर कमी होत असतानाच मंगळवारी (दि.२८) अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात ३८.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली असून, या पावसामुळे पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे.

दरवर्षी वर्षाची शेवट व नववर्षाची सुरुवात अवकाळी पावसाच्या हजेरीने होत असल्याचे दिसून येते. त्यानुसार, अचानकच मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

ढगांचा कडकडाट होत बरसलेल्या पावसामुळे आता पावसाळा सुरू झाल्याचा अनुभव येत आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान वाढत असल्याने थंडीचा जोर कमी होताना दिसत होता. मात्र, मंगळवारी सायंकाळी अचानकच पावसाने हजेरी लावली त्यामुळे पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे. बुधवारीही (दि.२९) ढगाळ वातावरण होतेच व थंडीचा जोर दिसून आला. मंगळवारी बरसलेल्या पावसासोबतच सडक-अर्जुनी तालुक्यात काही ठिकाणी गारा पडल्या. यानंतर आता जिल्हावासीयांना स्वेटर घालावे की रेनकोट, असा प्रश्न पडत आहे.

तिरोडा तालुक्यात सर्वाधिक ५४.१ मिमी पाऊस

मंगळवारी जिल्ह्यात सरासरी ३८.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली असताना सर्वाधिक ५४.१ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. तर सर्वांत कमी २२.८ मिमी पाऊस गोंदिया तालुक्यात बरसल्याचे दिसत आहे. मात्र, अवघ्या जिल्ह्यातच पावसाने हजेरी लावली असून अवघा जिल्हाच पाणीदार झाला आहे.

सुकडी-डाकराम येथे गारपिटीसह झालेल्या पावसामुळे परिसरातील तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारपीटमुळे अनेक गावकऱ्यांच्या कौलारू घराचे तसेच रब्बी धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

ग्राम मुंडीपार येथे विजेचा कडकडाट व गारपिटीसह पाऊस झाल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. सायंकाळी साडेचार वाजेदरम्यान सुसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाल्याने अनेक घरांचे कौल आणि पत्रेदेखील उडून गेले. वीजपुरवठादेखील खंडित झाला. गारपीट एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की सर्व ठिकाणी गारपिटीचा थर जमा झाला होता. या गारपिटीमुळे शेतातील पालेभाज्यांचेदेखील प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोनामुळे शेतकरी संकटात सापडला असताना आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातल्या अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली.

पिकांना बसला फटका

शेतकऱ्यांनी सध्या हरभरा, गहू, लाखोळी, जवस, मोहरी तसेच भाजीपाला लावला आहे. तर काही शेतकऱ्यांनी आता रब्बीसाठी नर्सरी लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मंगळवारच्या या अवकाळी पावसामुळे या सर्वच पिकांना फटका बसला आहे. एकीकडे खरिपातील पिकाची पाऊस व कीडरोगांनी नासाडी केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच आता अवकाळी पावसामुळे या रब्बी पिकांची नासाडी झाल्यास शेतकरी आणखीच अडचणीत येणार, यात शंका नाही.

तालुकानिहाय बरसलेल्या पावसाचा तक्ता

तालुका- पाऊस

गोंदिया- २२.८

आमगाव- ३२.६

तिरोडा- ५४.१

गोरेगाव- ५०.२

सालेकसा-३३.९

देवरी-४२.३

अर्जुनी-मोरगाव-५२.३

सडक-अर्जुनी-२९.१

एकूण - ३८.८

Web Title: gondia reports 38.8mm untimely rain in 29th december, crop loss due to hailstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.