Gondia: कत्तलखान्यात जाणाऱ्या ६७ जनावरांची सुटका, ३१ लाख २ हजार रूपयाचा माल जप्त
By नरेश रहिले | Published: September 3, 2023 04:23 PM2023-09-03T16:23:03+5:302023-09-03T16:24:05+5:30
Gondia: देवरी तालुक्याच्या चिचगड परिसरातून जनावरांच्या कत्तलीसाठी तस्करी करणाऱ्या वाहनाला पोलिसांनी रविवारी (दि. ३) पकडले. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद पाटील यांच्या नेतृत्वात पथकाने केली आहे.
- नरेश रहिले
गोंदिया - देवरी तालुक्याच्या चिचगड परिसरातून जनावरांच्या कत्तलीसाठी तस्करी करणाऱ्या वाहनाला पोलिसांनी रविवारी (दि. ३) पकडले. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद पाटील यांच्या नेतृत्वात पथकाने केली आहे. या प्रकरणात ३१ लाख २ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी येत्या सण- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत अवैधरीत्या चालणाऱ्या धंद्यांचे समूळ उच्चाटन तसेच अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करून अवैध धंद्यांवर अंकुश व आळा घालण्याकरिता कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने चिचगड पोलिसांची अवैध धंद्याविरुद्ध विशेष धाड मोहीम सुरू आहे. ३ सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे चिचगड पोलिसांनी गस्त घालून अवैध जनावरे वाहतूक करणाऱ्यानवर कारवाई केली.
गडेगाव (कोसबी) ते मेहताखेडा जंगल परिसरातून गडेगाव रस्त्यावर २ ट्रक सीजी ०७ सीजी ८६७६ व सीजी ०८ झेड ८७५२ हे छत्तीसगड कडून देवरी हायवेकडे जातांना त्या ट्रकचा पाठलाग करून पकडले. यावेळी ट्रक सीजी ०७ सीजी ८६७६ चा चालक जंगलाचा फायदा घेऊन जंगलात पळून गेला. त्या दोन्ही ट्रकमध्ये ६७ जनावरे दोरीने बांधुन डांबून ठेवले होते. पकडलेल्या जनावरांची किंमत ४ लाख २ हजार व दोन ट्रकची किंमत २७ लाख रूपये असा एकुण ३१ लाख २ हजार रूपयाचा माल जप्त करण्यात आला. चिचगड पोलिसांनी आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम ११ (१) (ड), सहकलम ५ (अ) ६, ९ (अ) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, सहकलम ११९ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार न्यायमुर्ती करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, देवरीचे उपविभागिय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनात चिचगडचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोलीस उपनिरीक्षक जेनसिंग सोंजाल, पोलीस हवालदार न्यायमूर्ती, पोलीस नायक कमलेश शहारे, अमित मेंढे, संदीप तांदळे यांनी केली आहे.