गोवर-रुबेला टिकाकरणात गोंदिया राज्यात दुसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 08:26 PM2018-12-08T20:26:51+5:302018-12-08T20:28:20+5:30
गोवर-रूबेला या आजारावर मात करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने २७ नोव्हेंबर पासून लसीककरण सुरू केले. या लसीकरण अभियानात गोंदिया जिल्ह्यात मागील ९ दिवसांत ४८.५९ टक्के बालकांना लसीकरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोवर-रूबेला या आजारावर मात करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने २७ नोव्हेंबर पासून लसीककरण सुरू केले. या लसीकरण अभियानात गोंदिया जिल्ह्यात मागील ९ दिवसांत ४८.५९ टक्के बालकांना लसीकरण करण्यात आले. या लसीकरणाने गोंदिया राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर भंडारा व गडचिरोली जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहेत.
या अभियानात गोंदिया जिल्ह्यातील आंगणवाडी, प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांतील ३ लाख ६५ हजार ९५८ बालकांना लस लावण्यात येणार आहे. केंद्र सरकारने सन २०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मुलन व रूबेलावर नियंत्रण करण्याचे लक्ष्य केंद्रीत करण्यात आले. यासाठी केंद्र सरकार विविध राज्यात टप्याटप्यात गोवर-रूबेला लसीकरण करणार आहे.
आतापर्यंत २१ राज्यात ९.६० कोटी बालकांना लस देण्यात आली आहे. तर २७ नोव्हेंबर पासून राज्यात अभियानाला सुरूवात करण्यात आली. असून राज्यात ३.१० कोटी बालकांना या अभियानांतर्गत लस देण्यात येणार आहे. २९ डिसेंबर पर्यंत लस देण्याची ही मोहिम राबविली जाणार आहे.
सडक-अर्जुनीत सर्वाधिक ५३.९८ टक्के लसीकरण
जिल्ह्यात ३ लाख ६५ हजार ९५८ बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या ९ दिवसांच्या काळात २ लाख ४५८ बालकांना लस द्यायची होती. यातील १ लाख ७७ हजार ८०५ (८८.७० टक्के) बालकांना लस देण्यात आली. जिल्ह्यातील ४७.७९ टक्के बालकांना लस देण्यात आली. यात, सडक-अर्जुनी तालुक्यात ५३.५८ टक्के, सालेकसा ५०.३७, देवरी ५०.४६, आमगाव ५१.४७, गोंदिया ग्रामीण ४९.४०, तिरोडा ग्रामीण ४८.११, अर्जुनी मोरगाव ४७.८८, तिरोडा शहर ६३.४४, गोरेगाव ४३.०५ व सर्वात कमी गोंदिया शहरात ४१.२७ टक्के लसीकरण झाले.
नागपूर विभागात चंद्रपूर पिछाडीवर
गोवर-रूबेला (एमआर) लसीकरण अभियानात राज्यात भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात ७ दिवसात ४२ टक्के लसीकरण पहिल्या क्रमांकावर आहे. तर गोंदिया जिल्ह्यात ४१ टक्के लसीकरण करण्यात आले असून जिल्हा दुसºया, वर्धा जिल्हा ३७ टक्के लसीकरण करीत चवथ्या तर नागपूर २७ टक्के लसीकरण करीत २१ व्या क्रमांकावर आहे. यात २६ टक्के लसीकरण करीत चंद्रपूर जिल्हा २५ व्या क्रमांकावर आहे.
या अभियानातून एकही बालक सुटू नये या दिशेने आरोग्य विभाग काम करीत आहे. लसीकरणानंतर प्रत्येक बालकाला प्रमाणपत्र देण्यात येत आहे. सरक्षेच्या दृष्टीने आपल्या बालकांना लस द्यावी.
डॉ.श्याम निमगडे
जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गोंदिया.