क्राईमच्या ‘टॉप फाईव्ह’ मध्ये गोंदिया ग्रामीण प्रथम
By admin | Published: May 23, 2016 01:38 AM2016-05-23T01:38:53+5:302016-05-23T01:38:53+5:30
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने ग्रामीण भागात अमूलाग्र बदल घडवून आणला. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मात्र गुन्ह्यात घट आहे.
नरेश रहिले गोंदिया
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने ग्रामीण भागात अमूलाग्र बदल घडवून आणला. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मात्र गुन्ह्यात घट आहे. गोंदिया जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांची आकडेवारी पाहता यंदा जानेवारी ते आजपर्यंत गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. खूनाच्या घटनाही दोन घडल्या आहेत.
जिल्ह्यातील टॉप फाईव्ह मध्ये गोंदिया ग्रामीण अव्वल असल्याची माहिती पुढे आली आहे. जानेवारी ते आजपर्यंत गोंदिया जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे १५२ गुन्हे गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्या पाठोपाठ तिरोडा १४३, रामनगर १४१, रावणवाडी १०३, गोंदिया शहर १०० गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु या क्राईमवर अंकुश घालण्यासाठी बाळासाहेब पवार यांनी चंग बांधला आहे. गोंदिया जिल्ह्यात टॉप फाईव्हनंतर चिचगड ९०, देवरी ७१, आमगाव ५३, नवेगावबांध ४६, डुग्गीपार ४१, सालेकसा ३२, गोरेगाव ३२, अर्जुनी-मोरगाव २४, दवनीवाडा १९, गंगाझरी १८ व केशोरी १७ गुन्हे दाखल करण्यात आले.
गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणारा परीसर मध्यप्रदेशला लागून आहे. तसेच शहराच्या बाहेरील झोपडपट्टी भाग अधिक असल्याने या पोलीस ठाण्यांतर्गत सर्वाधीक गुन्हे घडल्याच्या नोंदी आहेत. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारुविक्री मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या ठिकाणी गुन्हे अधिकक घडतात. गोंदिया ग्रामीण नंतर तिरोडा दुसऱ्या स्थानावर, रामनगर तिसरे, रावणवाडी चौथे तर गोंदिया शहर पाचव्या क्रमांकावर आहे.
२१ झाले बलात्कार
बलात्कारच्या घटना २ड नोंद करण्यात आल्या असल्यातरी मागील चार महिन्यात १६ पैकी ५ ठाण्यांमध्ये एकही घटना नोंद नाहीत. चिचगड, केशोरी, गोरेगाव, रावणवाडी व गंगाझरी या ठाण्यांमध्ये बलात्काराच्या घटनांची यावर्षी नोंद नाही. मात्र तिरोडा ४, आमगाव, सालेकसा व गोंदिया शहर प्रत्येकी ३, गोंदिया ग्रामीण २, देवरी, डुग्गीपार, अर्जुनी-मोरगाव, नवेगावबांध, रामनगर व दवनीवाडा या पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला. महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी पुढाकार आवश्यक आहे.
नऊही खून ग्रामीण भागातील
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम शांततेची पुरस्कर्ता असली तरी या मोहीमेकडे शासनानेच मागील तीन-चार वर्षापासून सपशेल दुर्लक्ष केल्यामुळे आता ग्रामीण भागातील गुन्हेगारीचा आकडा वाढत चालला आहे. मागील चार महिन्यात गोंदिया जिल्ह्यात नऊ खूनाच्या घटना घडल्या आहेत. त्या नऊही घटना गोंदिया शहरातल्या नसून ग्रामीण भागात असलेल्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील आहेत. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हदञदीत दोन खून, डुग्गीपार ठाण्याच्या हद्दीत दोन खून, आमगाव, सालेकसा, चिचगड, गोरेगाव, तिरोडा या पोलीस ठाण्यांतर्गत प्रत्येकी एक खून असे नऊ खून झालेत. खूनाच्या प्रयत्नात गोंदिया शहर अव्वल असून या ठिकाणी ४ नोंदी घेण्यात आल्या. गोंदिया ग्रामीण २, तिरोडा, रामनगर व दवनीवाडा या ठाण्यात प्रत्येकी एक अश्या नोंदी घगण्यात आल्या.
१२२ चोऱ्या, २१ घरफोड्या
जिल्ह्यात जानेवारी ते आजपर्यंत १२२ चोऱ्या तर २१ घरफोड्या झाल्याची नोंद घेण्यात आली. आमगाव ठाण्यांतर्गत ४ चोरी, २ घरफोडी, सालेकसा ८ चोरी, देवरी ११ चोरी, ४ घरफोडी, चिचगड ३ चोरी, डुग्गीपार १० चोरी, अर्जुनी-मोरगाव ४ चोरी, २ घरफोडी, नवेगावबांध चोरी, घरफोडी प्रत्येकी १, केशोरी २ चोऱ्या, गोरेगाव १ चोरी, ३ घरफोडी, तिरोडा ७ चोऱ्या, रावणवाडी ७ चोरी, २ घरफोडी, रामनगर १७ चोरी, १ घरफोडी, दवनीवाडा २ चोरी, गंगाझरी ५ चोरी, शहर २७ चोऱ्या, ५ घरफोड्या, गोंदिया ग्रामीण १३ चोरी, १ घरफोडीची नोंद करण्यात आली.