राष्ट्रीय लोकअदालतीत दहा हजार प्रकरणांचा निपटारा, ४ कोटी २० लाखांची वसुली, ९२१ फौजदारी प्रकरणे निकाली
By नरेश रहिले | Published: December 10, 2023 02:14 PM2023-12-10T14:14:37+5:302023-12-10T14:15:25+5:30
Gondia News: वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचाराने व सामंजस्याने तत्काळ निकाली काढण्यासाठी रविवारी (दि.९) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे व सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
- नरेश रहिले
गोंदिया - वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचाराने व सामंजस्याने तत्काळ निकाली काढण्यासाठी रविवारी (दि.९) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे व सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत १० हजार ८१ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला.
राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष ए. टी. वानखेडे, सचिव एस. व्ही. पिंपळे, जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. खान, जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एन. डी. खोसे, तदर्थ न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एन. बी. लवटे, दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) आर.एस.कानडे, मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कुलकर्णी, कामगार न्यायाधीश वाय. आर. मुक्कणवार, सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. आर. मोकाशी, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ रतर एस. एस. धपाटे, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व्ही. ए. अवघडे, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एम. बी. कुडते, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वाय. जे. तांबोली, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस. डी. वाघमारे, ६ वे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर टी. व्ही. गवई, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सी. के. बडे उपस्थित होते.
लोकअदालतीत या प्रकरणांचा निपटारा
जिल्हयातील एकूण न्यायालयात प्रलंबित दिवाणी ६८० प्रकरणांपैकी ६१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये १ कोटी ४२ लाख ६ हजार ९४५ रुपये वसुलींचे प्रकरणे निकाली काढण्यात आले. न्यायालयात प्रलंबित २,५०६ फौजदारी प्रकरणांपैकी ९२१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. २ कोटी ८ लाख ८४ हजार ८३८ रुपये वसुलींचे प्रकरणे निकाली निघाली. लोकअदालतमध्ये ठेवण्यात आलेले पूर्वन्यायप्रविष्ट १९,०८३ प्रकरणांपैकी ९०९९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये ६९ लाख ६५ हजार २० रुपयांची वसुली झाली. एकूण २२ हजार २६९ ठेवलेल्या प्रकरणापैकी १० हजार ८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. एकूण ४ कोटी २० लाख ५६ हजार ८०३ रुपये वसुली झाली.
पक्षकारांचा मानसिक व आर्थिक त्रास वाचला
स्पेशल ड्राइव्ह अंतर्गत जिल्ह्यातील न्यायालयामध्ये एकूण १३०७ फौजदारी प्रकरणे आली होती. त्यापैकी ७८७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामुळे पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास यामधून सुटका मिळाली.