Gondia: रेतीचा टिप्पर पकडल्याचे प्रकरण : पोलिसाला तिघांनी चक्क दीड तास थांबविले
By नरेश रहिले | Published: October 22, 2023 09:21 PM2023-10-22T21:21:19+5:302023-10-22T21:22:35+5:30
Gondia: रेती तस्करांचे मनसुबे चांगलेच वाढले असून आता ते पोलिसांनाही घाबरत नसल्याचे दिसत आहे. कारण, रेतीची वाहतूक करणारा टिप्पर पकडल्यावरून तिघांनी पोलिस कर्मचाऱ्याला तब्बल दीड तास थांबवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
- नरेश रहिले
गोंदिया - रेती तस्करांचे मनसुबे चांगलेच वाढले असून आता ते पोलिसांनाही घाबरत नसल्याचे दिसत आहे. कारण, रेतीची वाहतूक करणारा टिप्पर पकडल्यावरून तिघांनी पोलिस कर्मचाऱ्याला तब्बल दीड तास थांबवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम रोंढा येथे शुक्रवारी (दि.२०) सकाळी हा प्रकार घडला.
सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम रोंढा येथील वळणावर पोलिस नाईक दिनेश जांभूळकर यांनी रेतीची वाहतूक करणारा टिप्पर क्रमांक एम.एच. ३५, एजे. २८३२ थांबविला. चालकाला रॉयल्टी संदर्भात विचारणा केली असता त्याने २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३:१० वाजता दरम्यान परवानगी असलेली रॉयल्टी दाखविली. त्यात खाडाखोडसुद्धा करण्यात आली होती. त्या टिप्परमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रेती असल्यामुळे तो टिप्पर पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना आरोपी गंगाप्रसाद चेतन सिंहोरे (३०, रा. पानगाव), विशाल रामदास दसरीया (२४) व भीमराम शिवलाल नागपुरे (२४, रा. मुंडीपार) या तिघांनी पोलिस नाईक जांभुळकर यांना तब्बल दीड तास थांबवून त्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेसंदर्भात सालेकसा पोलिसांनी आरोपींवर भादंविच्या कलम ३४१,१८६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस नाईक तुरकर करीत आहेत.