Gondia | कोसबी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 02:12 PM2022-10-14T14:12:02+5:302022-10-14T14:12:56+5:30
गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
सडक अर्जुनी (गोंदिया) : तालुुक्यातील कोसबी परिसरात मागील आठ-दहा दिवसांपासून एका बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या बिबट्याने पाच-सहा जनावरांची शिकार केली होती. त्यामुळे पशुपालक आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या बिबट्याला कोसबी गावात वन विभागाच्या चमूने गुरुवारी (दि. १३) रात्री ८ वाजताच्या सुमारास जेरबंद केले. त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोहमारा सहवन क्षेत्रातील कोसबी गावात गुरुवारी सायंकाळी ६:३०च्या सुमारास भीमराव शालिग्राम गहाणे यांच्या घरात बिबट्याने ठाण मांडले होते. याची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाला दिली.
माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला. रात्री ८ वाजताच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.