गोंदिया ते नागपूर रेल्वे प्रवास झाला ८ तासांचा; प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2022 03:41 PM2022-11-11T15:41:47+5:302022-11-11T15:43:56+5:30
तीन-चार दिवसांपासून समस्या
गोंदिया : मागील तीन-चार दिवसांपासून रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे ढासळले आहे. गोंदिया ते नागपूर या दोन तासांच्या प्रवासासाठी एक्स्प्रेस असो की मेल सात ते आठ तास लागत आहे. आउटवर व ठिकठिकाणी एक ते दीड तास गाड्या थांबविल्या जात आहे. यामुळे प्रवासी चांगलेच त्रस्त झाले असून, रेल्वे विभागावर असंतोष व्यक्त करीत आहे.
हावडा-मुंबई मार्गावरील कळमना, सालवा दरम्यान मागील तीन-चार दिवसांपासून इंटरलॉकिंगचे काम सुरू आहे. यामुळे विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस व छत्तीसग, शिवनाथ या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे, तर काही एक्स्प्रेस आणि मेल गाड्या सुरू आहेत.
मंगळवारी (दि.८) गोंदिया रेल्वे स्थाकावरुन सिकंदराबाद एक्स्प्रेस ही रात्री ८.३० वाजता सुटली तर ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे 3.४० ला नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचली. तर बुधवारी ओखा एक्स्प्रेस ही सायंकाळी ४ वाजता सुटली ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर रात्री ११ वाजता पोहोचली. गोंदिया ते नागपूर या प्रवासाठी तव्चल ७ ते ८ तास लागले. यामुळे अनेक प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी अडचण झाली आहे. काही प्रवाशांना रात्र उपाशीपोटी काढावी लागली. तर रस्त्यात अनेक ठिकाणी गाडी दोन ते दीड तास थांबविली जात असल्याने प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
मागील तीन-चार दिवसांपासून हाच प्रकार कायम असल्याने आणि यात रेल्वे प्रशासनाने कसलीही सुधारणा न केल्याने रेल्वे प्रवाशांचा मनस्ताप कायम आहे.
मालगाड्यांसाठी प्रवासी गाड्या वेटिंगवर
कोरोना कालावधी केवळ मालगाड्याच सुरु होत्या. यातून रेल्वेला चांगला महसूल मिळाला. तेव्हापासून रेल्वे बोर्डाने प्रवासी गाड्यांऐवजी मालगाड्यांना प्राधान्य दिले आहे. तोच प्राधान्यक्रम अद्यापही कायम असल्याने प्रवासी गाड्या थांबवून मालगाड्या सोडल्या जात आहे. परिणामी, या प्रवासी गाड्या चार ते पाच तास विलंबाने धावत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
आउटरवर गाड्यांची रांग
प्रवासी गाड्यांना आउटरवर एक ते दीड तास थांबवून मालगाड्या आधी सोडल्या जात आहे. यामुळे प्रवासी गाड्या रेल्वे स्थानकाजवळ नियोजित वेळेत पोहोचून देखील त्यांना आउटवर थांबविले जात असल्याने त्या उशिराने धावत आहे. तर आउटवर एका मागे एक गाड्यांची रांग लागत आहे.