Gondia: जनावरांची वाहतूक करणारी दोन वाहने पकडली, गोरेगाव पोलिसांची कारवाई
By कपिल केकत | Published: November 16, 2023 04:09 PM2023-11-16T16:09:58+5:302023-11-16T16:11:32+5:30
Gondia News: जनावरांना कत्तलीकरिता घेऊन जाण्यासाठी अवैधरीत्या वाहतूक करीत असलेल्या दोन वाहनांना पोलिसांनी पकडले. गोरेगाव पोलिसांनी ठाणा चौक येथे बुधवारी (दि.१५) सायंकाळी ४ वाजेदरम्यान ही कारवाई केली.
- कपिल केकत
गोंदिया - जनावरांना कत्तलीकरिता घेऊन जाण्यासाठी अवैधरीत्या वाहतूक करीत असलेल्या दोन वाहनांना पोलिसांनी पकडले. गोरेगाव पोलिसांनी ठाणा चौक येथे बुधवारी (दि.१५) सायंकाळी ४ वाजेदरम्यान ही कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी दोन वाहने व ११ जनावरे असा एकूण चार लाख ५५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत अवैधरीत्या धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे, तसेच सर्व अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करून आळा घालण्याकरीता पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी सर्व ठाणेदारांना सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार पोलिसांची अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध धाड मोहीम सुरू आहे. अशात बुधवारी (दि.१५) गोरेगाव पोलिसांनी डायल ११२ वरून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाणा चौक येथे सायंकाळी ४ वाजेदरम्यान अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमएच ३५ के ४०९९ व वाहन क्रमांक एमएच ४० एएफ ६०५८ ला पकडले. या वाहनांची तपासणी केली असता त्यात एकूण ११ जनावरे निर्दयीपणे कोंबून व बांधून ठेवल्याचे दिसून आले. यावर पोलिसांनी दोन्ही वाहने किंमत चार लाख रुपये व ५५ हजार रुपये किमतीची जनावरे, असा एकूण चार लाख ५५ हजार रुपयांचा माल जप्त केला. ही कामगिरी पो.नि. भुसारी यांचे पथक सपोनि. अमोल काळे, पोउपनि सुजित घोलप, सहायक फौजदार यशवंत शहारे, हवालदार अडमाची, लांजेवार, शिपाई कुमडे, केवट, दास, खेकरे यांनी केली आहे.
या तिघा आरोपींवर गुन्हा दाखल
या प्रकरणात पोलिसांनी संदेश एकनाथ फुल्लुके (४१, रा. मुरपार, ता. सडक-अर्जुनी), विकास आनंद भोंडे (२६, रा. सातलवाडा, ता. साकोली) व आकाश संजय जगने (३२, रा. आमगाव) यांच्याविरुद्ध गोरेगाव ठाण्यात कलम ११(१) (ड), ११(१), (ई), प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा १९६० सहकलम ६,९ महा. पशु. संरक्षण अधि.अन्वये गुन्हा नोंद केला आहे, तसेच जनावरांना सुरक्षा व चारापाण्याची सोय व्हावी याकरिता गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.