गोंदिया विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक महिलांचे मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 05:46 PM2024-11-22T17:46:49+5:302024-11-22T17:47:42+5:30
Gondia : लाडक्या बहिणींचा वाढला टक्का; कोण अधिक, कोण उणे?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यावेळेच्या विधानसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानात वाढलेल्या महिला मतदारांच्या टक्क्याची सर्वाधिक चर्चा होती. जिल्ह्यातील चारही मतदारसंघापैकी गोंदिया विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक १ लाख १७ हजार ३७ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. आमगाव मतदारसंघात सुध्दा ९८ हजार ३४८ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. या दोन्ही मतदारसंघातील महिला मतदारांचा वाढलेला टक्का कुणासाठी दिलासादायक आणि कुणाला देणार धक्का याचीच चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसह इतर लाभाच्या योजनांची घोषणा केली होती. त्यामुळेच निश्चितच याचे प्रतिबिंब विधानसभा निवडणुकीतील मतदानावर उमटणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. लगतच्या मध्यप्रदेशात सुध्दा लोकसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेने भाजपच्या उमेदवारांना मैदान मारण्यात महत्त्वाची भूमिका बजाविला होती. तेच चित्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत दिसून आले.
जिल्ह्यात बुधवारी (दि.२०) पार पडलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान महिला मतदारांची मतदानासाठी सकाळपासूनच झालेली मतदानाची गर्दी बरेच काही सांगून गेली होती. त्यामुळे लाडक्या बहिणी नेमक्या कुणाला तारणार आणि कुणाला मारणार याचीच सुरु झाली होती. हेविवेट नेते आणि उमेदवारांचा मतदारसंघ म्हणून गोंदिया विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो. या मतदारसंघातून एकूण १५ उमेदवार रिंगणात होते मात्र थेट लढत ही महायुतीतील भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल व महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्यातच झाला. या मतदारसंघात एकूण ७१.०७ टक्के मतदान झाले आहे. ११४३४७ पुरुष तर ११७०३७ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून आपला कौल दिला. अटीतटीच्या लढतीत लाडक्या बहिणींचा वाढलेला टक्का नेमका कुणाला तारणार आणि कुणाला मारणार याचीच मतदारसंघात चर्चा रंगली आहे.
मतदान व महिला मतदारांचा टक्का अधिक
आमगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक सुध्दा अत्यंत चुरशी होणार असल्याची चर्चा मतदारसंघात होती. महायुतीतील भाजपचे उमेदवार संजय पुराम विरुद्ध महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार राजकुमार पुराम यांच्यात थेट लढत झाली. भाजपचे बंडखोर उमेदवार शंकरलाल मडावी यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने यात मतविभाजनाचा फटका भाजपला बसून काँग्रेसला लाभ होण्याची शक्यता वर्तविली जात होती. पण या मतदारसंघात झालेले सर्वाधिक ७२.७४ टक्के मतदान आणि ९८३४८ महिला मतदारांनी बजावलेला मतदानाचा हक्क यामुळे कुणाचे पारडे जड आणि कुणाचे हलके झाले यावरून चर्चा रंगली आहे.
अर्जुनी मोरगाव, तिरोड्यातही निर्णायक भूमिका
अर्जुनी मोरगाव मतदारसंघात ९०६०६ तर तिरोडा विधानसभा मतदारसंघात ८८८४२ महिलांनी मतदानाचा हक्क बजाविला. अर्जुनी मोरगाव तिहेरी तर तिरोडा मतदारसंघात थेट लढत झाली. त्यामुळे या चुरशीच्या सामन्यात महिला मतदारांचे मतदान अत्यंत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे आता २३ तारखेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.
असे आहे चारही मतदारसंघातील महिलांचे मतदान
विधानसभा मतदारसंघ महिलांचे झालेले मतदान
गोंदिया ११७०३७
आमगाव ९८३४८
अर्जुनी मोरगाव ९०६०६
तिरोडा ८८८४२