Gondia: पाच हजार रुपयांची लाच स्वीकारतांना महिला सरपंच अडकल्या, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
By अंकुश गुंडावार | Published: October 1, 2024 09:48 PM2024-10-01T21:48:21+5:302024-10-01T21:49:51+5:30
Gondia News: ग्रामरोजगार सेवकाचे चार महिन्याचे थकीत मानधन काढून देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती स्विकारतांना तिरोडा तालुक्यातील इंदोरा (खूर्द) येथील महिला सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
गोंदिया - ग्रामरोजगार सेवकाचे चार महिन्याचे थकीत मानधन काढून देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती स्विकारतांना तिरोडा तालुक्यातील इंदोरा (खूर्द) येथील महिला सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.१) करण्यात आली. सरीता सुनील तुमसरे (३४) रा. इंदोरा खुर्द, ता. तिरोडा असे लाच स्विकारणाऱ्या महिला सरपंचाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार हे ग्रामपंचायत इंदोरा खुर्द अंतर्गत रोजगार सेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे माहे मार्च, एप्रिल, मे व जून २०२४ या चार महिन्यांचे ५३२०० रुपयांचे मानधन थकले होते. या मानधनाचा धनादेश ग्रामसेवक यांनी स्व:ताची सही करून तक्रारदार यांच्याकडे दिला. तक्रारदार हे सदर धनादेशावर सही घेण्याकरीता सरपंच सरीता तुमसरे यांच्याकडे गेले असता त्यांनी धनादेशावर सही करण्याकरीता तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी ला.प्र.वि. गोंदिया येथे तक्रार दिली होती. तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. मंगळवारी (दि.१) सरपंच सरीता तुमसरे यांनी तक्रारदारदाराच्या थकीत मानधनाच्या धनादेशावर सही करण्याकरीता पाच हजार रुपयांच्या लाचेची पंचासमोर मागणी करुन पाच हजार रुपये लाच ग्रामपंचायत कार्यालयात स्वीकारली. त्यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी तिरोडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक विलास काळे, सहायक फौजदार चंद्रकांत करपे, पोलिस हवालदार संजय कुमार बोहरे, मंगेश काहालकर, ना.पो.शि. संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, कैलास काटकर, संगीता पटले, रोहिणी डांगे यांनी केली.