गोंदियात शारदा विसर्जनासाठी गेलेला बुडाला तरुण तलावात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 01:44 PM2017-10-04T13:44:45+5:302017-10-04T13:45:45+5:30
शारदा विसर्जनाकरिता गोंदिया येथील विठ्ठल रुख्मिणी तलावावर गेलेला तरुण तलावात बुडाला. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. अंकुश राजेश उके (वय १९वर्ष) असे तलावात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.
गोंदिया : शारदा विसर्जनाकरिता गोंदिया येथील विठ्ठल रुख्मिणी तलावावर गेलेला तरुण तलावात बुडाला. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. अंकुश राजेश उके (वय १९वर्ष) असे तलावात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान रात्री अंधारामुळे शोध मोहीम राबवता आली नाही. त्यामुळे बुधवारी(४ ऑक्टोबर) सकाळी ७ वाजल्यापासून स्थानिक नागरिकांच्या मदतीने तलावात बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली.
गोविंदपूर मार्गावरील एका सार्वजनिक शारदा उत्सव मंडळातर्फे स्थापन करण्यात आलेल्या शारदादेवीचे विसर्जन मंगळवारी रात्री छोटा गोंदिया परिसरातील विठ्ठल रुख्मिणी तलावात करण्यात आले. अंकुशसुद्धा त्याच्या मित्रांसह शारदा विसर्जनाकरिता या तलावावर गेला होता. दरम्यान अंकुश आणि त्याचा मित्र तलावात उतरले. मात्र काही वेळानंतर त्याचा मित्र बाहेर आला. पण अंकुश बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या मित्रानं तलाव परिसरात त्याचा शोध घेतला मात्र तो कुठेच आढळला नाही. त्यामुळे त्याने याची माहिती अंकुशच्या कुटुंबीयांना दिली.
अंकुशच्या वडिलांनी रात्रीच शहर पोलीस ठाणे गाठून याची माहिती शहर पोलिसांनी दिली. रात्री फार उशीर झाल्याने तलावात शोध मोहीम राबविता आली नाही. त्यामुळे पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बुधवारी (4 ऑक्टोबर) सकाळी ७ वाजल्यापासून शोध मोहीम राबविण्यात आली. या घटनेची माहिती शहरात पसरताच शहरवासीयांनी छोटा गोंदिया परिसरातील विठ्ठल रुख्मिणी तलावाजवळ गर्दी केली होती. नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी काही नगरसेवकांसह तलावावर पोहोचत परिसराची पाहणी केली. तरुणाच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. दरम्यान बुधवारी (4 ऑक्टोबर) दुपारी 1 वाजेपर्यंत बुडालेल्या तरुणाचा शोध लागला नव्हता.
दहा दिवसांचा शारदा उत्सव
गोंदिया जिल्ह्यात नवरात्रीच्या पाच दिवसानंतर शारदादेवीची स्थापना केली जाते. हा उत्सव दहा दिवसांचा असतो. हा उत्सव देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मंगळवारपासून शारदा विसर्जनाला सुरूवात झाली आहे.