Gondia: तुझी-माझी जोडी सगळ्यांत न्यारी, नोंदणी करणारी, ५९९ जोडप्यांनी केली विवाह नोंदणी
By कपिल केकत | Published: January 18, 2024 09:49 PM2024-01-18T21:49:18+5:302024-01-18T21:49:40+5:30
Gondia News: विवाहात होणारा अवाढव्य खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने विवाह आटोपून घेण्याचा नवा ट्रेंड सध्या आजच्या पिढीत वाढताना दिसत आहे. नातेवाईक व काही मित्रमंडळींच्या उपस्थितीत विवाह आटोपून घेण्याची पद्धती वाढत चालली आहे.
- कपिल केकत
गोंदिया - विवाहात होणारा अवाढव्य खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने विवाह आटोपून घेण्याचा नवा ट्रेंड सध्या आजच्या पिढीत वाढताना दिसत आहे. नातेवाईक व काही मित्रमंडळींच्या उपस्थितीत विवाह आटोपून घेण्याची पद्धती वाढत चालली असून, त्यानंतर ही लग्नगाठ अधिक मजबूत करण्यासाठी ते विवाह नोंदणीवर जास्त भर देत आहेत. हेच कारण आहे की, विवाह नोंदणीचा आकडा वाढताना दिसत आहे.
‘घर म्हणते बांधून बघ व विवाह म्हणते करून बघ’ अशी म्हण प्रचलित असून, घरात जेवढा पैसा लावला तेवढा कमीच असतो व विवाहावरही जेवढा पैसा लावला तेवढा कमीच असतो, असा याचा अर्थ आहे. ही म्हण वास्तविकतेला जुळणारी असून, कित्येक विवाह जीवनात एकदाच होत असल्याने धूमधडाक्यात करण्यासाठी लाखो रुपये ओततात. विवाहावर जेवढा पैसा खर्च करा तेवढा कमीच असल्याने पैशांची उधळण करण्यापेक्षा तेवढा पैसा वर-वधूंना भविष्यासाठी देणे जास्त फायद्याचे असते. नेमकी हीच धारणा आजच्या पिढीत निर्माण झाली आहे. यातूनच आजची पिढी अत्यंत साध्या पद्धतीने विवाह आटोपून घेण्यावर भर देतात. दोन्ही बाजूंचे नातेवाईक व काही मित्रमंडळींच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडतो व असे कित्येक विवाह आता बघावयास मिळत आहेत.
विशेष म्हणजे, साध्या पद्धतीने विवाह आटोपून घेतल्यानंतर मात्र आजची पिढी आपल्या विवाह बंधनाला अधिक घट्ट करण्यासाठी न विसरता विवाह नोंदणी करीत आहे. हेच कारण आहे की, कधी काळी विवाह होऊन कित्येक वर्षे लोटल्यानंतरही विवाहाची नोंदणी केली नव्हती. आता मात्र विवाह होताच विवाह नोंदणी केली जात असून, यामुळेच विवाह नोंदणीचा आकडा वाढताना दिसत आहे. नगर परिषद विवाह नोंदणी कार्यालयात सन २०२२ मध्ये ५३७ विवाह नोंदणी करण्यात आले आहेत. तर सन २०२३ मध्ये त्यात वाढ झाली असून, ५९९ विवाह नोंद करण्यात आल्याची नोंद आहे. म्हणजेच, विवाह नोंदणी करण्याकडे आजच्या पिढीचा कल वाढताना दिसत आहे.
विवाह नोंदणीबाबत जनजागृतीची गरज
- दरवर्षी जिल्ह्यात हजारोंच्या घरात विवाह सोहळे पार पडतात. मात्र, झालेल्या विवाहांची नोंदणी मात्र शेकड्यातच दिसून येते. यामागचे कारण म्हणजे, आजही कित्येकांना विवाह नोंदणी करण्याची गरज काय आहे, याबाबत माहिती नाही. आजच्या पिढीत बहुतांश वर-वधू दोघेही नोकरी करणारे असल्याने पुढे जाऊन त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्राची गरज पडते व त्यासाठी ते विवाह नोंदणी करवून घेतात. याबाबत सर्वसामान्यांनाही माहिती मिळावी, यासाठी विवाह नोंदणीबाबत जनजागृतीची गरज आहे.
नोंदणीसाठी लागणार ही कागदपत्रे
- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड, नगरसेवकाचे प्रमाणपत्र, वर-वधूचे पासपोर्ट आकाराचे ३ फोटो, विवाह पत्रिका, पंडित किंवा विवाह करवून देणाऱ्या संस्थेचे प्रमाणपत्र, कोर्ट तिकीट, सुरू वर्षाची घर कर पावती, तीन साक्षीदार व त्यांचे आधारकार्ड, रेशनकार्ड व प्रत्येकी एक पासपोर्ट फोटो. या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स व ती प्रमाणित केलेली असावी.
२०२२ व २०२३ मध्ये नोंदणी झालेले विवाह
महिना- २०२२- २०२३
जानेवारी- २३-२३
फेब्रुवारी-४२-१८
मार्च- ५९-५१
एप्रिल- ४९- ६१
मे- ४३- ५९
जून- ७२-८७
जुलै- ५६-८३
ऑगस्ट- ४३-५३
सप्टेंबर- ३७-५३
ऑक्टोबर- १७-३९
नोव्हेंबर- ४८-३१
डिसेंबर- ४८- ५०
एकूण- ५३७- ५९९